अध्याय अकरावा
बाप्पांनी सामान्य माणसाचाही उद्धार व्हावा या दृष्टीने भक्तिमार्गाची भलावण केली आहे. बाप्पांच्यावर अत्यंत श्रद्धा असलेला भक्त स्वत:ला विसरून बाप्पांची अनन्य भक्ती करत असतो. त्याला बाप्पांच्याकडून कधीही, काहीही नको असतं. त्यामुळे बाप्पा त्याचे अंकित होतात आणि इतरांना जे मिळणं केवळ अशक्य आहे, असं परब्रह्म बाप्पा त्याला प्रदान करतात. मनुष्य सर्व काही देऊ शकेल पण स्वत:ला विसरू शकत नाही, हे फक्त अनन्य भक्तालाच शक्य होतं मग त्यानं काहीही न मागता बाप्पा त्यांच्याकडून जे सर्वोच्च देणं शक्य आहे ते त्याला देतात.
परब्रह्माची प्राप्ती होण्यासाठी योगसाधना, निरपेक्ष कर्मयोग आणि भक्तीयोगाची साधना वेदांनी सांगितली आहे पण पहिली दोन साधने आत्तापर्यंत देह म्हणजेच मी असे समजणाऱ्या सामान्य भक्तासाठी सहजसाध्य नसतात. तरीही गणेशगीतेचे नित्य पठण करून, त्यात सांगितल्याप्रमाणे जो आचरण करेल त्याला ब्रह्मप्राप्ती करून देण्याचे सामर्थ्य गणेशगीतेत आहे. बाप्पांच्या कृपेने अत्यंत श्रद्धेने नित्य पठण करणाऱ्याची चित्तशुद्धी होत राहून त्याचे सर्व विकार गळून पडतील व मृत्यूनंतर त्याचा उद्धार होईल. जो अनन्य भक्त असतो तो केवळ जगात फक्त बाप्पांचं अस्तित्व आहे असं मानून तो गणेशगीता वाचत असतो.
भक्त सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे हे लक्षात घेऊन बाप्पा त्याला निर्विकारी बनवतात आणि त्याचा उद्धार करतात. बाप्पा अनन्य भक्ताचा उद्धार तर करतातच पण अगदी एखादा महापापी असेल पण उपरती होऊन त्यानं जर गणेशगीता वाचली तर त्याचाही निश्चित उद्धार होतो असं पुढील श्लोकात सांगितलंय.
ब्रह्मघ्नो मद्यपऽ स्तेयी गुरुतल्पगमोऽ पि यऽ ।
चतुर्णां यस्तु संसर्गी महापातककारिणाम् ।। 45 ।।
स्त्राrहिंसागोवधादीनां कर्तारो ये च पापिनऽ ।
ते सर्वे प्रतिमुच्यन्ते गीतामेतां पठन्ति चेत् ।। 46 ।।
अर्थ-ब्रह्महत्या करणारा, मद्यपी, चोर, गुरुपत्नी गमन ही चार महापातके करणाऱ्यांशी संबंध ठेवणारा, स्त्राrहिंसा-गोवध वगैरे करणारे पापी असे सर्व जर ही गीता पठण करतील तर ते मुक्त होतील.
विवरण- महापापी मनुष्याचाही उद्धार करायचं सामर्थ्य गणेशगीतेत आहे पण त्यासाठी वाल्या कोळ्यासारखी दृढ निष्ठा मात्र पाहिजे. त्याने पूर्वी केलेल्या महापापाबद्दल पश्चात्ताप पाऊन, अत्यंत श्रद्धेने रामनाम घेतले आणि त्याचा उद्धार होऊन त्याचे वाल्मिकी ऋषित रूपांतर झाले. त्याप्रमाणेच जो महापापी अत्यंत श्रद्धेने गणेशगीता वाचेल त्याची मागची सर्व पापे धुवून जाऊन त्याचा उद्धार होईल असे सामर्थ्य गणेशगीतेत आहे. गणेशगीतेच्या पठणाने नराचा नारायण कसा होतो ते पुढील श्लोकात सांगितले आहे.
य: पठेत्प्रयतो नित्यं स गणेशो न संशयऽ ।
चतुर्थ्यां यऽ पठेद्भक्त्या सोऽपि मोक्षाय कल्पते ।। 47 ।।
अर्थ- जो यमाने युक्त होऊन नित्य या गीतेचे पठण करेल तो गणेशच होय यात संशय नाही. चतुर्थीचे दिवशी जो भक्तीने पठण करेल तो देखील मोक्षाचा अधिकारी होईल.
विवरण- गणेशगीतेचे जो नियमित पठण करतो त्याचे त्यातील उपदेशाच्या प्रभावाने व बाप्पांच्या आशीर्वादाने सगळं वागणं बोलणंच बदलून जातं. त्याला सर्वांच्यातील ईश्वर दिसू लागतो. त्याचे कामक्रोधादि विकार गळून पडतात. त्याला सर्व माणसं एकाच कुटूंबातील व्यक्ती वाटायला लागून त्याची विश्वबंधुत्वाची भावना दृढ होते. असा बदल झाल्यामुळे त्याचे साक्षात गणेशात रूपांतर होते. कित्येक संत मंडळींची चरित्रे आपल्याला ह्या श्लोकाचा प्रत्यय देतात. अनन्य भावाने जो ईश्वराची भक्ती करतो तो निखालस त्यांच्यासारखाच होतो.
क्रमश:








