अध्याय एकोणतिसावा
देवभक्ती करणं किती सोपं आहे हे भगवंतांना उद्धव वर्णन करून सांगत आहेत. देवभक्ती एव्हढी सोपी असण्याचे कारण म्हणजे भक्ती करण्यासाठी देव भक्ताला सहाय्य करतात. कारण देवांना भक्तांची फार आवड असते. भक्ताने त्यांची केलेली निरपेक्ष भक्ती आणि त्यातून त्यांना अर्पण केलेले प्रेम म्हणजे त्यांचा जीव की प्राण होय. हा योग सतत येत रहावा ह्या उद्देशाने भगवंत भक्ताला सदैव मदत करत असतात. त्याबद्दल देवांशी बोलताना उद्धव म्हणाला, हृषीकेशी तुमच्या भक्तांवरील प्रेमाची महती काय सांगावी? त्या प्रेमाच्या बदल्यात त्यांना तुम्ही कायम संतुष्ट ठेवता. तुमची सेवा करण्यात त्यांना कोणतीही अडचण येऊ नये ह्याची व्यवस्था तुम्ही स्वत: करता. उदाहरणार्थ तुमची सेवा करण्यासाठी त्यांना कुठेही जावे लागत नाही. कारण तुम्ही त्यांच्या हृदयातच राहता. त्यामुळे ते केव्हाही तुमची सेवा करू शकतात. तुमच्या सेवेसाठी कोणत्याही धनाची आवश्यकता लागत नाही. त्यामुळे अगदी गरिबातला गरीबही तुमची सेवा करू शकतो. तुमची भक्ती करताना त्यांना कोणतेही शारीरिक कष्ट करावे लागत नाहीत. केवळ तुमच्या पायावर डोके ठेवले की, तुम्ही स्वानंदघन संतुष्ट होता. तुम्ही संतुष्ट झालात की, भक्ताचे मोठेच काम होते. तुमच्या कृपेमुळे त्याचे प्रपंचाचे वेड संपुष्टात येते. म्हणजे त्याचा प्रपंच आहे तसाच असतो पण त्याला लागलेले त्याचे वेड तसेच त्यातील ओढ, आसक्ती, अपेक्षा ह्या सगळ्या गोष्टी दयाघना तुमच्या कृपेने नाहीशा होतात. त्रिगुणांच्या बेडीत अडकलेला तुमचा भक्त त्या बेडीतून मुक्त होतो. अशी तुमची सेवा सहज करता येण्याजोगी आहे. तेव्हा दीनदयाळा तुझी सेवा करायची चालून आलेली संधी जो सोडतो तो केवळ मूर्ख आणि मतीमंद असतो. ह्या विश्वाचे क्षणाक्षणाचे व्यापार तू चालवतोस हे तुझे महात्म्य लक्षात घेता तुझ्या सेवेकडे पाठ फिरवणाऱ्या माणसांना परमपामर अभागीच म्हणायला पाहिजे. असे अभागी परमपामर लोक तुझ्या सुखरूप करणाऱ्या सेवेची उपेक्षा करून सदासर्वकाळ विषयांच्या विषाच्या प्याल्याची अपेक्षा करतात. विषयांच्या उपभोगातून ज्या विषाचे ते सेवन करतात ते विष इतके जहाल असते की, त्याचा कणभर जरी पोटात गेला तरी तो आत्मसुखाचा नाश करून टाकतो. एव्हढेच नव्हे तर जन्ममरणाच्या चक्रात अडकवून न सोसणाऱ्या दु:खाचा सामना करायला लावतो. म्हणून विषयांच्या उपभोगाची जे इच्छा धरतात ते निश्चितच अभागी होत. पण तुझी निस्वार्थ सेवा करून तुझे भक्त मात्र सुखसंपन्न आणि अतिसमर्थ होतात. ते संसारात असून विरक्त असतात. अर्थात ह्यात नवल असे काहीच नाही. कारण संसारातून मिळणाऱ्या सुखापेक्षा कितीतरी उच्च कोटीच्या आत्मसुखाचा त्याने अनुभव घेतलेला असतो. हा आत्मसुखाचा अनुभव भक्तांना तू कसा देतोस ते तू भगवदगीतेच्या दहाव्या अध्यायात सांगितलेच आहेस. ते असे, चित्ते प्राणे जसे मी चि एकमेकांस बोधिती । भरूनि कीर्तने माझ्या ते आनंदात खेळती । 9 । असे जे रंगले नित्य भजती प्रीती-पूर्वक । त्यांस मी भेटवी माते देउनी बुद्धि-योग तो । 10 । करूनि करुणा त्यांची हृदयी राहुनी स्वये। तेजस्वी ज्ञान-दीपाने अज्ञान-तम घालवी । 11 । तुझी सेवा केल्यामुळे तू त्यांना बुद्धियोग प्रदान करतोस. त्यामुळे ज्ञान-दीपाने त्यांचा अज्ञान-तम नाहीसा होतो त्यामुळे ते आत्मज्ञानी होतात. तुझ्या चरणांची धूळ पृथु, जनक ह्या राजामहाराजांना सुद्धा वंदनीय आहे. हे राजे तुझी सेवा करत असल्यामुळे त्यांना इंद्रादिक देवसुद्धा वंदन करतात. एव्हढेच नव्हे तर रिद्धीसिद्धी सुद्धा त्यांच्या पायाशी लागतात. अनंत काळपर्यंत तप करूनसुद्धा ज्या सिद्धी हाताशी लागत नाहीत त्या सिद्धी भक्तांच्या मात्र पायाशी लागतात. असं तुझ्या भक्तीचं श्रेष्ठत्व आहे. विशेष म्हणजे कोणतेही योगसाधन न करता केवळ एकचित्ताने तुझी भक्ती करणाऱ्या भक्ताला सर्व सिद्धी सहजभावाने शरण येतात. म्हणून जे योगी योगसाधनेबरोबर तुझी भक्ती करतात ते योगशास्त्रात लवकर प्रवीण होतात.
क्रमश:








