अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा, साधकाला योगाभ्यास करायची तीव्र इच्छा झाली तरी ती सहजासहजी पूर्ण होत नाही, कारण त्यामध्ये अनेक अडथळे येतात. ते अडथळे अनेक प्रकारचे असतात. कधी त्याला शरीराचे आजारपण सतावत असते तर कधी एखाद्या विषयाचा उपभोग त्याला सतावत असतो. काहीवेळा आपल्याला सगळं येऊ लागलंय अशा भ्रांतीने तो योगमार्गापासून विचलित होतो. एव्हढेच नव्हे तर काहीवेळा त्याला त्याच्या ज्ञानाचा गर्व होतो. तो स्वत:ला श्रेष्ठ समजू लागतो. त्यातूनच त्याला इतरांच्यातील दोष दिसू लागतात आणि त्यासंबंधी मनात येणाऱ्या विचारात तो गुंतून पडतो. नैसर्गिक वातावरणाच्या बदलामुळेही कधी कधी त्याच्या योगाभ्यासात खंड पडतो. कधी त्याला थंडी वाजू लागते तर कधी उकडू लागते. शारीरिक अडथळे तर अनेक प्रकारचे असतात. कधी त्याला पोटातील वायूचा उपद्रव होतो तर कधी भूक आवरेनाशी होते. अशा उपद्रवामुळे त्याचे पित्त खवळते आणि त्याचीही अडथळ्यात भर पडते. आणखीन सांगायचे म्हणजे परस्त्राr, परद्रव्य ह्यांचीही कधी कधी साधकाला आसक्ती म्हणजे ओढ वाटू लागते. आता ह्यावर उपाय कोणते तेही सांगतो ऐक, देहात शीतलता वाढली की उष्ण पदार्थ खावेत. देहात उष्मा वाढला की थंड पदार्थ खावेत. पोटात साठलेल्या वायूचा त्रास होऊ लागला तर भूक खवळते आणि ती कितीही खाल्ले तरी शांत होत नाही.
अशावेळी प्राणायाम करून प्राण आणि अपान समान करावेत. प्राणापानाची साम्यता झाली की त्यांचातले ऐक्य वाढते आणि मग षटचक्रे भेद व्हायला फारसा वेळ लागत नाही. हे साध्य झाले की, खवळलेली भूक शांत होते. योगाभ्यासात येणाऱ्या इतर अडचणीबद्दल आता पुढे सांगतो. परस्त्राrचे आकर्षण आणि परद्रव्याचा लोभ हे मोठेच अडथळे साधकाला योगाभ्यास करण्यापासून अडवत असतात. हे दोन्ही अडथळे ही पापकर्माची फळे होत. त्या फळापासून सुटका होण्यासाठी तपश्चर्या हाच उपाय आहे. साधकाने मनोभावे जर मंत्रानुष्ठान केलं तरी त्याला वैराग्य प्राप्त होते. वैराग्य म्हणजे आहे त्या परिस्थितीत समाधानाने राहणे. वैराग्य प्राप्तीमुळे विषयोपभोगांची इच्छा समूळ नष्ट होते. शुद्ध मंत्रांचे पुरश्चरण केल्याने विघ्नांचे निर्दालन होते. तसेच पिशाचबाधा, संचार हे सगळे जीव घेऊन पळत सुटतात. साधकाच्या शरीराला जर काही आजार झाले तर दिव्य औषधीने ते बरे होतात. मनाची एकाग्रता साधण्याआधी शारीरिक शुद्धी साधावी लागते. त्यामुळे अधिव्याधी समूळ नाहीशा होतात. योगसाधनेत येणाऱ्या अनेक विघ्नांना दूर करायचे निरनिराळे उपाय मी सांगितले. आता हे मी वेगळे सांगायला नकोच असं म्हणून, भगवंतानी भक्तासाठी अत्यंत मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, उद्धवा भक्तिभावाने माझे ध्यान केले असता योगसाधनेत येणाऱ्या सर्व अडचणींचे, विघ्नांचे निर्दालन होते. आधिव्याधी, सर्व विघ्ने, विकल्प, विकर्म, देहाभिमान, ज्ञानाभिमान हे सर्व केवळ माझे ध्यान केल्याने जळून नष्ट होते. माझ्या ध्यानाचा परिपाठ ठेवला तर योगाभ्यासात येणारे अडथळे सहजासहजी पळून जातात. साधकांना सर्व सृष्टीत कुणी त्रास देणारा म्हणून उरत नाही. माझे ध्यान करण्याचा नाद लागला की, अडचणीना जागाच रहात नाही. सर्व विघ्नांचा नाश झाल्याने मनात विकल्प म्हणून रहात नाही. उद्धवाने हे सगळे ऐकले. भगवंतांचे मनोभावे ध्यान केल्याने सर्व विघ्ने दूर पळून जातील ह्याची त्यालाही खात्री होती परंतु माणसाचे मन अतिशय चंचल असल्याने ते एका जागी स्थिर करणे हे कर्मकठीण काम आहे हे तो जाणून होता. त्यामुळे ध्यान करण्यासाठी आवश्यक असलेली एकाग्रता कशी साधायची हे काही त्याच्या लक्षात येईना. भगवंत आपल्या मनातले विचार तत्काळ ओळखतात हे तोही जाणून होता. त्यामुळे आपल्या मनातल्या शंकेचे उत्तर ते कसे देतात ह्याची तो उत्सुकतेने वाट पाहू लागला.
क्रमश:








