प्रशिक्षणार्थी म्हणून होतील रूजू, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
पणजी प्रतिनिधी
स्वयंपूर्ण मित्र आणि तालुकास्तरीय अधिकारी यांच्याशी प्रशिक्षणार्थी व कौशल्य विकास या विषयावर थेट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आभासी संवाद साधताना सांगितले की, 15 जुलैपर्यंत आयटीआय, हस्तकला पॉलिटेक्निक यासारख्या विविध क्षेत्रांतर्गत तऊण व महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य, पुनर्कुशलीकरण आणि अपस्किलिंगवर भर देण्यात येणार आहे. तसेच नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम पोर्टलवर नोंदणी केलेल्या 5 हजार तऊणांना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर थेट सरकारी खात्यांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून सामील करून घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
आतापर्यंत केवळ 1200 युवकांची नोंदणी
आतापर्यंत केवळ 1200 युवकांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती देत मुख्यमंत्र्यांनी युवकांनी डेटा एन्ट्री, अकौंटंट, ड्रायव्हर, क्लिनर इत्यादी उपलब्ध संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. गेल्या 8 दिवसांपासून सरकारने सरकारी खात्यांमध्ये सुमारे 1096 करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. खासगी कंपन्यांच्या संदर्भात, 50 टक्के तऊणांना प्रशिक्षणाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याच कंपनीत कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी मिळू शकतात, अशी माहितीही त्यांनी दिली.
लवकरच ‘शिका आणि कमवा’चा शुभारंभ
गोवा राज्यात 15 वर्षांचे वास्तव्य असलेल्या शिकावू उमेदवाराला 15000 ऊपये विद्यावेतन दिले जाईल. नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम पोर्टलवर तऊणांची शिकावू म्हणून नोंदणी करणे हे प्रत्येक पंचसदस्य, सरपंच आणि नगरसेवक यांचे त्यांच्या संबंधित पंचायत आणि नगरपालिकांचे प्रयत्न असले पाहिजे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या योजनेचा लाभ केवळ एक वर्षाच्या कालावधीसाठी शिकावू उमेदवाराला मिळेल. येत्या शैक्षणिक कालावधीत लवकरच ‘शिका आणि कमवा’चा शुभारंभ केला जाईल असेही ते म्हणाले.