15 उमेदवारांच्या भवितव्याचा होणार फैसला
प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील तीन जिल्हा पंचायतींसाठी आज दि. 16 ऑक्टोबर रोजी होणाऱया पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून सकाळी 8 वाजल्यापासून मतदानप्रक्रिया प्रारंभ होणार आहे. या दरम्यान कोरोना रुग्णांसाठी विशेष वेळ निर्धारित करण्यात आली आहे. सायंकाळी 4 ते 5 या वेळेत ते मतदान करू शकणार आहेत.
उत्तर गोव्यातील रेईश मागूश आणि दक्षिण गोव्यातील कुठ्ठाळी व दवर्ली या तीन पंचायतींसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. प्रत्येक तालुक्यांच्या उपजिल्हाधिकाऱयांची निर्वाचन अधिकारी तर मामलेदारांची सहाय्यक निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने तिन्ही पंचायतींसाठी आचारसंहिता लागू केली असून सर्वसाधारण निरीक्षक, खर्च निरीक्षक यांची नियुक्ती केली आहे. त्याशिवाय जिल्हाधिकाऱयांकडून भरारी पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रिया विनाव्यत्यय पार पडावी यासाठी पूरक पोलीस फौज तैनात करण्यात आली आहे.
ही निवडणूक पक्षीय पातळीवर होणार असून भाजप, काँग्रेस, आप आदी पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत. त्याशिवाय आरजी पक्षाने तिन्ही ठिकाणी उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. निवडणूक मतपत्रिकेच्या माध्यमातून होणार आहे. एकूण 15 उमेदवार रिंगणात असून दि. 18 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी पेडे म्हापसा येथील क्रीडा संकूल, मडगाव येथील माथानी साल्ढाणा प्रशासकीय इमारत आणि बायणा वास्को येथील रवींद्र भवन येथे केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.









