5 डिसेंबरला मतदान, 8 डिसेंबरला मतमोजणी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
निवडणूक आयोगाने ओडिशा, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधील पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. येथे 5 डिसेंबरला मतदान आणि 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. उत्तर प्रदेशमधील मैनपुरी लोकसभा मतदारसंघात खासदारकीसाठी मतदानाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच ओडिशामधील पदमपूर, राजस्थानमधील सरदारशहर, बिहारमधील कुर्शनी, छत्तीसगडमधील भानुप्रतापपूर आणि उत्तर प्रदेशमधील रामपूर येथे विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी गुजरात विधानसभेच्या निवडणुकाही जाहीर झाल्या असून तेथेही 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. गुजरातसह हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी 8 डिसेंबरला होणार आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या घोषणेनुसार विधानसभा पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर 10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 18 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. 21 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. 5 डिसेंबरला मतदान आणि 8 डिसेंबरला मतमोजणी निश्चित करण्यात आली आहे. 10 डिसेंबरपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.









