ऑनलाईन टीम/तरुण भारत
Gautam Adani : अदानी समूहाचे प्रमुख प्रमुख गौतम अदानी (Gautam Adani) यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत महत्वपूर्ण विधान केलं आहे. २०३० पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (Largest Economy) म्हणून उदयास येईल, असा अदानी यांनी व्यक्त केला आहे. वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाऊंटंट्सला संबोधित करताना त्यांनी यावर वक्तव्य केलं. भारत 2050 पर्यंत ३० ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. परंतु २०५० पर्यंत भारत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असाही विश्वास अदानी यांनी व्यक्त केला. (By 2030, India will be world’s 3rd largest economy)
भारत पुढील दशकात दर १२ ते १८ महिन्यांच्या कालावधीत त्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनात १ ट्रिलियन डॉलर्स जोडण्यास सुरूवात करेल. कोरोनाचा काळ, रशिया-युक्रेनमधील युद्ध, हवामान बदलाचे आव्हान आणि महागाईत झालेली अभूतपूर्व वाढ यामुळे जागतिक नेतृत्वासमोर संकट निर्माण झाले आहे. २०५० पर्यंत भारताचे स्टॉक मार्केट कॅपिटल ४५ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे जाणार असल्याचंही अदानी यांनी म्हटलं आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना गौतम अदानी म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेला 1 ट्रिलियन डॉलरची पहिली अर्थव्यवस्था होण्यासाठी ५८ वर्षे लागली. केवळ ५ वर्षांत ३ ट्रिलियन डॉलर्सचा आकडा गाठला आहे. पुढील १२ ते १८ महिन्यांत भारत ४ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचेल. यासोबतच भारत २०५० पर्यंत ३० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे सुरु असलेल्या वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाउंटट्समध्ये (World Congress of Accountants 2022) “India’s Path to an Economic Superpower” या विषयावर भाषण करताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. पुढे बोलताना गौतम अदानी म्हणाले की, एकेकाळी वसाहतवाद्यांनी चिरडेला भारत देश आज लक्षणीय विकासाच्या उंबरठ्यावर उभा आहे. १९४७ नंतर भारतात लोकशाही व्यवस्था टिकणार नाही, असे म्हटले जात होते. लोकशाही आणि देशातील विविधतेशी कोणतीही तडजोड न करता एक उच्च उत्पन्न असलेले राष्ट्र म्हणून भारत उदयास येत आहे. अदानी यांनी पुढे म्हटले की, २०३० पूर्वी आपण जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असू आणि त्यानंतर २०५० पर्यंत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.