भेसळ नसल्याची शहानिशा करा : अन्यथा आजार हटकून
बेळगाव : दररोजच्या आहारात आमटी हा पदार्थ हमखास असतो. धान्यात भेसळ अनेकदा दिसून येते. आता तुरडाळीतही भेसळ होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रासायनिक रंगमिश्रीत डाळीसारखी दिसणारी केसरी नावाची डाळ तूरडाळीमध्ये मिश्रण करण्यात येत आहे. तूरडाळीची आमटी सेवन केल्यानंतर आरोग्याला अपाय होण्याची शक्यता अधिक आहे. लॅथेरिझम नावाचा अपंगपणा, मज्जातंतूचा विकार, कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असल्याचे अन्नसुरक्षा खात्याच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या डोंगराळ प्रदेशात व उत्तर भारताच्या काही भागात डाळीसारखे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. केसरी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उत्पादनाची स्वस्तामध्ये विक्री होत असते.
त्यामुळे ते खरेदी करून तूरडाळीमध्ये मिश्रण करण्याचे प्रकार व्यापाऱ्यांकडून घडत आहे. तूरडाळ व केसरी डाळ यातील फरक ग्राहकांना लक्षात येत नाही. ग्राहक खरेदी करतात, मात्र भेसळ तूरडाळ सेवनामुळे आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी तूरडाळ खरेदी करताना त्यात भेसळ नाही याची शहानिशा करूनच खरेदी करणे हितवर्धक ठरेल, असे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. केसरी नावाने ओळखली जाणारी डाळ ही रंगाने व आकारानेही तूरडाळीसारखी दिसते. या डाळीचे उत्पादन वन परिसरात अधिक प्रमाणात होते. त्यामध्ये विषारीपणा असतो. भेसळ तूरडाळीच्या सेवनाने लॅथेरिझमसारखा आजार होऊ शकतो. हा आजार मज्जातंतूवर आघात होण्याने जडत असून त्यामुळे कायमस्वऊपी अपंगत्व येऊ शकते.
मधामध्येही भेसळ
मधामध्येही रासायनिक रंगाची भेसळ करण्यात येत असल्याच्या तक्रारी अन्न सुरक्षा खात्याकडे आल्या आहेत. विविध ठिकाणी विक्री करण्यात येत असलेल्या मधांचे नमुने मिळवून ते प्रयोगशाळेकडे पाठवून देण्यात येत आहेत, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
भेसळ कशी ओळखावी?
तूरडाळ खरेदी केल्यानंतर त्यात भेसळ आहे की नाही? हे ओळखण्यासाठी अन्न सुरक्षा खात्याने परीक्षा सांगितली आहे. 10 ग्रॅम तूरडाळीमध्ये 25 मिली शुद्ध पाणी मिश्रित करून त्यात 5 मिली हैड्रोक्लोरिक अॅसिड मिश्रण करावे व मंद आचेवर तापवावे. पाण्याचा रंग बदलल्यास त्यात भेसळ असल्याचे म्हणावे. त्याचबरोबर भेसळ करण्यात आलेली केसर डाळ पाण्यावर तरंगू लागते, अशी माहिती अन्न सुरक्षा खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.









