श्वानासोबत व्हॅनमध्ये राहते महिला
भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांना अनेक तडजोडी कराव्या लागतात. याचमुळे प्रत्येक जण स्वत:चे घर खरेदी करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु सध्या घर इतके महाग झाले आहे की, ते खरेदी करणे प्रत्येकालाच शक्य राहिलेले नाही. एक महिला घराचे भाडे देत देत इतकी वैतागून गेली की तिने एक व्हॅन खरेदी करत त्यालाच घराचे स्वरुप दिले आणि आता स्वत:च्या पाळीव श्वानासोबत त्यात राहत आहे.
27 वर्षीय निकोल कीफी न्यूकॅसल येथे राहणारी फोटोग्राफर आहे. आतापर्यंत तिने 18 वेगवेगळ्या भाड्यांच्या घरांमध्ये वास्तव्य केले आहे. परंतु आता नवा पर्याय शोधण्याची वेळ आल्याचे तिला वाटले आणि तिने सप्टेंबर 2023 मध्ये मोठा निर्णय घेतला. एक कार दुर्घटनेनंतर तिने गाडीला राइट ऑफ केले, म्हणजेच ती चालविण्यायोग्य राहिली नव्हती. यानंतर तिने 9.6 लाख रुपयांमध्ये एक कन्व्हर्टेबल फोर्ड ट्रान्झिट व्हॅन खरेदी केली आणि मग असा प्रवास सुरू केला की तिला आता घराची गरजच भासत नाही.
निकोल एक फॅशन फोटोग्राफर असल्याने ती दिवसा व्हॅनला स्वत:च्या कामाच्या ठिकाणी पार्क करते. वीकेंडला ती ब्रिटनच्या सर्वात सुंदर ठिकाणी हिंडते. तिने स्कॉटलंडपासून नॉर्थ वेल्सपर्यंतचा प्रवास केला आहे. ती फ्रीलांसिंग देखली करते, तर काही ठिकाणी तिला थांबून कामही करावे लागते. एका महिन्याला ती 73 हजार रुपये खर्च करते, ही रक्कम तिच्या घराच्या भाड्यापेक्षा खूपच कमी आहे.
तिचा श्वान मॅककार्टनीला देखील व्हॅनमध्ये राहणे अत्यंत पसंत आहे. निकोल आता स्वत:ला अधिक आत्मविश्वासू मानते. आता ती पुन्हा 9 ते 5 अशी नोकरी करताना स्वत:ला पाहू शकत नाही. ही व्हॅन मला फेसबुक मार्केटप्लेसवर दिसली होती. व्हॅनमध्ये किचन, सिंक आणि बेड तसेच सोलर पॅनेल, फ्रीज, गॅस आणि एअर फ्रायर देखील आहे. तिचा एक लॉन्ग डिस्टेंस पार्टनर देखील असून तो तिला सपोर्ट करतो. रस्त्याच्या कडेला असलेल्या 24 तासांच्या कार पार्किंगमध्ये ती व्हॅन पार्क करत असते.









