दुष्काळ परिस्थिती आढावा बैठकीत पालकमंत्र्यांची ग्राम पंचायतींना सूचना : अन्यथा ग्राम पंचायत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा
बेळगाव : जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवल्यास त्वरित टँकरने पाणीपुरवठा करावा, पाणीसमस्या दूर करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीने स्वत:च टँकर खरेदी करावा, अशी सूचना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली. शुक्रवारी सुवर्ण विधानसौध येथे दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलताना पालकमंत्री पुढे म्हणाले, प्रत्येक ग्राम पंचायतीने स्वत:चा टँकर खरेदी करावा. यासाठी गेल्या काही वर्षांपूर्वी सूचना दिली होती. किमान यंदा तरी पाणीसमस्येवर मात करण्यासाठी स्वत:चा टँकर खरेदी करून त्याची यादी पुरविण्याची सूचनाही त्यांनी केली.
जर टँकर खरेदी केला नाही तर तशा ग्राम पंचायतीतील अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, पिण्याच्या पाण्यासंदर्भात टास्कफोर्सची बैठक घेऊन आराखडा तयार करण्याची सूचनाही सतीश जारकीहोळी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. पावसाअभावी शेतकरी संकटात आहे. त्यामुळे पीकहानीची भरपाई बरोबरच जनावरांसाठी चारा पुरविण्याकडे लक्ष द्यावे. नरेगा योजनेंतर्गत कामे हाती घ्यावीत, असेही त्यांनी सांगितले. बहुतेक ठिकाणी जलजीवन मिशनची कामे अपूर्ण आहेत. जेथे झाली आहेत ती निकृष्ट आहेत, अशा तक्रारी नागरिकांकडून आल्या आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी योजना नियोजित वेळेत पूर्ण कराव्यात. दुष्काळी स्थिती हाताळण्यासाठी सरकारने 22.50 कोटी रुपये मंजूर केले आहेत. एकूण यासाठी 32 कोटी रुपये उपलब्ध आहेत. त्यामुळे निधीची कमतरता भासणार नाही, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
जिल्ह्यात 3 लाख 65 हजार हेक्टरमध्ये पीकहानी झाली आहे. एनडीआरएफ नियमावलीनुसार 422 कोटी रुपये भरपाई केंद्राकडून यायला हवी. जनावरांसाठी सध्या चाऱ्याची कमतरता नाही. जानेवारीनंतर गरज भासल्यास चारा खरेदीसाठी टेंडर मागविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. यावेळी जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनीही पिण्याची पाणीसमस्या दूर करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, कुडचीचे आमदार महेंद्र तम्मण्णावर, सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी आदी उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना चाऱ्याचे किट वाटप करण्यात आले.









