वृत्तसंस्था/ कार्डीफ
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने आपल्याच देशाचा माजी कर्णधार अॅलेक स्टीवर्टला वनडे क्रिकेट प्रकारात मागे टाकले आहे. इंग्लंडतर्फे आता वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधित धावा जमविणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बटलर पाचव्या स्थानावर आहे. सध्या सुरू असलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात बटलरने 68 चेंडूत 72 धावा जमविताना 2 षटकार आणि 5 चौकार नोंदविले.
बटलरने इंग्लंडतर्फे वनडे क्रिकेटमध्ये 166 सामन्यात 41.76 धावांच्या सरासरीने 4719 धावा जमविल्या असून त्यामध्ये 11 शतके आणि 25 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 162 ही बटलरची सर्वोत्तम खेळी आहे. इंग्लंडतर्फे वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा जमविणाऱ्या फलंदाजांच्या यादीत माजी कर्णधार मॉर्गनने पहिले स्थान मिळविताना 225 सामन्यात 39.75 धावांच्या सरासरीने 6957 धावा जमविल्या असून त्यामध्ये 13 शतके आणि 42 अर्धशतकांचा समावेश आहे. इंग्लंडचा जो रूट 6213 धावांसह दुसऱ्या, इयानबेल 5416 धावांसह तिसऱ्या, पॉल कॉलींगवूड 5092 धावांसह चौथ्या स्थानावर आहेत.









