वार्ताहर /किणये
चोर्ला रोडवरील किणये ते पिरनवाडी या टप्प्यात पॅचवर्कचे कामकाज करण्यात आले होते. मात्र नावगे क्रॉसपासून किणयेपर्यंतच्या रस्त्याचे पॅचवर्क कामकाज निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. त्यामुळे अवघ्या दोन महिन्याभरातच या रस्त्यावर पुन्हा ठिकठिकाणी खड्डे दिसू लागले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर केवळ पॅचवर्कचे साँग करण्यात आले असल्याच्या तक्रारी वाहनधारकांतून होत आहेत.
किणये ते पिरनवाडीपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला होता. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहनधारक व स्थानिक नागरिकांनी केली होती. त्यामुळे गेल्या दोन महिन्याभरापूर्वीच किणयेपासून पिरनवाडीपर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. काही ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले. मात्र, किणये ते नावगे क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत.
पश्चिम भागातील अनेक गावांसाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. तसेच बेळगाव चोरला मार्गे गोव्याला ये-जा करणाऱया वाहनधारकांची या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात गर्दी असते. मात्र, ठिकठिकाणी असलेल्या खड्डय़ांमुळे वाहनधारक वैतागून गेले आहेत.
या खड्डय़ांमुळे अनेक अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत तसेच रात्रीच्यावेळी अंधारातून येत असताना वाहनधारकांची गैरसोय होऊ लागली आहे. खड्डय़ांचा अंदाज येत नसल्यामुळे दुचाकीस्वार व सायकलस्वार घसरुन पडण्याचे प्रकार अधिक घडू लागले आहेत.
जाब विचारणार कोण
दोन महिन्याभरापूर्वी या रस्त्याचे पॅचवर्कचे काम करण्यात आले. मात्र सदर कामकाज करीत असताना बऱयाच ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले नाहीत. याची या भागातील साऱयांनाच माहिती आहे. परंतु सदर कंत्राटदाराला जाब विचारणार कोण असा सवाल उपस्थित होत आहे.
ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यायला हवा
ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य या रस्त्यावरूनच येतात. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये या रस्त्याबद्दल चर्चा होणे अपेक्षित आहे ग्रामपंचायतच्यावतीने संबंधित खात्याच्या अधिकाऱयांना निवेदन देण्यात यावे व या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









