छत्तीसगड येथील भटक्या जमातीमधील कुटुंबीयाकडून लोककलेचा खेळ सादर : खादरवाडी क्रॉस येथे सादरीकरण
आण्णाप्पा पाटील /बहाद्दरवाडी
पूर्वी मोबाईल, टीव्ही, इंटरनेट हे माध्यम कमी प्रमाणात होते. या कालावधीत गावांमध्ये फिरून भटक्या जमातीमधील लोक लोककला सादर करून नागरिकांचे निखळ मनोरंजन करीत होते. अलीकडच्या काळात बऱ्याच लोककला लोप पावण्याच्या मार्गावर आहेत. अशीच एक धोकादायक पण वडिलोपार्जित सुरू असलेली लोककला खानापूर रोड, खादरवाडी क्रॉस येथे छत्तीसगड येथील कुटुंब सादर करून आपल्या पोटाची खळगी भरताना दिसत आहे. दोरीवरून चालणाऱ्या बालिकेला पाहून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना आश्चर्य वाटत होते. मात्र ही लोककला सादर करून पोटापाण्याचा उदरनिर्वाह करतो असे त्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यामुळे हा संघर्ष, ही कसरत हे सारं काही केवळ पोटासाठीच असल्याचे दिसून आले. खादरवाडी क्रॉस येथील रस्त्याच्या बाजूला दोन लाकडी खांब उभारण्यात आले होते. त्या खांबाला एक लांब दोरी बांधण्यात आली होती. जमिनीपासून सर्वसाधारण आठ ते नऊ फूट उंचीवर ही दोरी होती. या दोरीवरून एक केवळ आठ वर्षाची बालिका चालत होती.
इतके धाडस या बालिकेमध्ये आले कसे असा प्रश्नही पाहणाऱ्यांना उपस्थित होत होता. मात्र वडिलोपार्जित सुरू असलेली ही कला सादर करून चार पैसे मिळवण्याचा या कुटुंबीयांचा प्रयत्न होता, असे त्यांना भेटल्यानंतर जाणवले. गेल्या महिन्याभरापासून छत्तीसगड येथून हे भटक्या समाजातील कुटुंब बेळगावमध्ये आलेले आहे. ठिकठिकाणी आपला खेळ सादर करत आहेत. दोरीवरून बालिका चालत जाते. यावेळी विविध प्रकारचे म्युझिक लावण्यात आले होते. तर काही वेळेस कुटुंबातील महिला व पुरुष ढोल इतर वाद्यांचा गजर करताना दिसत होते. दोरीवरून चालणाऱ्या या बालिकेचा व्हिडीओ बरेचजण आपल्या मोबाईलमध्ये घेताना दिसून आले. मात्र हा कठीण आणि धोकादायक असा खेळ सादर करून हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करते. दीड महिना ते दोन महिने या भागात हा खेळ सादर करून आम्ही पुन्हा आमच्या गावी जातो असे यातील एका सदस्याने सांगितले. खेळ बघितल्यानंतर कोणी दहा रुपये, वीस रुपये देतात, असेही त्यांनी सांगितले.
आधुनिक युगात खेळाकडे दुर्लक्ष
दोरीवरून चालत असताना तिच्या हातामध्ये एक लांब लाकडी काठी देण्यात येते. ही काठी मध्यभागी हातात पकडली जाते. या काठीमुळे दोरीवर बॅलन्स राहण्यासाठी मदत होते असे या समाजातील सदस्यांनी सांगितले. सदर ठिकाणी खेळ सुरू होता. प्रारंभी ती मुलगी दोरीवरून चालत होती. त्यानंतर तिने एक सायकलची रीम घेतली आणि त्या दोरीवरून रिमवरुन चालत ही मुलगी जात होती. हा खेळ धोक्याचा मात्र प्रश्न पोटाचा असे यातील महिलांनी बोलताना सांगितले. सध्याच्या आधुनिक युगात आमच्या या खेळाकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे याची खंतही त्यांनी व्यक्त करून दाखवली.
खेळ सादर करताना करावी लागते मेहनत
हा खेळ सादर करताना बरीच मेहनत घ्यावी लागते. आमच्या मुलाबाळांना चांगलं, उच्च शिक्षण द्यावं असं आम्हालाही वाटतं. मात्र आमचा हा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. त्याचे जतन आम्हाला केले पाहिजे. आमचा उदरनिर्वाह झाला पाहिजे. त्यामुळे आम्ही हा खेळ सादर करतो, असे या समाजातील वडीलधारी मंडळींनी सांगितले.
प्रशासनाने विविध योजना राबविण्याची गरज : गंगाप्रसाद
आमच्या कुटुंबीयांमध्ये वडिलोपार्जित ही लोककला सादर करण्यात येते. आमचा हाच व्यवसाय असल्यामुळे विविध ठिकाणी हा खेळ सादर करावा लागतो. त्यावरच आमच्या संसाराचा गाडा चालू असतो. सध्या पूर्वीसारखा प्रतिसाद या खेळाला मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने आमच्यासारख्या कलाकारांसाठी विविध योजना राबवून आम्हाला मदत करण्याची आवश्यकता आहे.
वर्षातून काही महिने शाळेलाही जाते : कविता
गेल्या एक वर्षापासून मी दोरीवरून चालत जाते. हे करत असताना प्रारंभी सुरुवातीला भीती वाटत होती. मात्र घरचे लोक हे करताना रोज पाहते त्यामुळे भीती दूर झाली आहे. दोन महिने या भागात मी कुटुंबीयांना मदत व्हावी यासाठी आले आहे. मी वर्षातून काही महिने शाळेलाही जाते, असे खेळ सादर करणाऱ्या कविताने सांगितले.









