बार्सिलोना/ वृत्तसंस्था
इंटर मियामी फुटबॉल क्लबमध्ये गेल्या महिनाभराच्या कालावधीत दोन अव्वल फुटबॉलपटूंसमवेत नवा करार करण्यात आला आहे. यापूर्वी या क्लबमध्ये बार्सिलोना क्लबकडून खेळणारा अर्जेंटिनाचा लायोनेल मेसी याचा समावेश झाला असून आता सर्जिओ बसक्वेटस् याच्याशीही क्लबने नवा करार केला आहे.

शुक्रवारी या क्लबच्या ट्विटरवर ही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली. 35 वर्षीय मेसीने आपण इंटर मियामी क्लबमध्ये दाखल होणार असल्याची घोषणा 7 जून रोजी केली होती. आता मेसी 21 जुलै रोजी होणाऱ्या पहिल्या सामन्यात इंटर मियामी क्लबच प्रतिनिधीत्व करणार आहे. बसक्वेटस्चा गेल्या महिन्यात बार्सिलोना क्लबबरोबरचा करार समाप्त झाला होता. या क्लबकडून तो जवळपास 20 वर्षे खेळत होता. पण या क्लबने त्याच्या करारामध्ये वाढ करण्यास नकार दिल्याने बसक्वेटस् आता इंटर मियामी क्लबकडून खेळणार आहे. बसक्वेटस्चा बार्सिलोनाबरोबरचा करार जूनअखेरीस संपणार आहे. 2005 साली बसक्वेटस्चे बार्सिलोनामध्ये आगमन झाले आणि त्याने 722 सामन्यात या क्लबचे प्रतिनिधीत्व केले होते.









