चेंबरची दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा
बेळगाव : आरपीडी सर्कल-देशमुख रोडवर सध्या सांडपाणी वाहत आहे. महापालिकेने मागील आठवड्यात दुरुस्ती करूनदेखील चेंबरमधून सांडपाणी ओव्हरफ्लो होत आहे. दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांना व्यापार करणेही अवघड झाले आहे. त्यामुळे व्यापारी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. देशमुख रोड परिसरात आठ ते दहा दिवसांपूर्वी चेंबरमधून गळती लागली होती. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली होती. परंतु त्यानंतरही सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावरून वाहत आहे. वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे सांडपाणी उडून आजुबाजूच्या दुकानापर्यंत पोहोचत आहे. या परिसरात अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तसेच हॉटेल असल्यामुळे त्यांना याचा फटका बसत आहे. अनेकवेळा तक्रारी करून देखील चेंबरची दुरुस्ती केली जात नसल्याने नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.









