वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नेहमीप्रमाणे सकाळी पदभ्रमण करणाऱ्या एका व्यापाऱ्याची दिल्लीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सुनिल जैन असे त्यांचे नाव असून ते यमुना क्रीडा क्षेत्रात पदभ्रमणासाठी गेले होते. चालण्याचा व्यायाम आटोपून ते आपल्या एका मित्राच्या स्कूटरवर मागे बसून घरी येत असताना त्यांच्यावर काही व्यक्तींनी गोळीबार केला. त्यांच्यावर सात ते आठ गोळ्या झाडण्यात आल्याचे दिसून आल्याची माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी दिली आहे.
जैन हे दिल्लीच्या कृष्णनगर भागात वास्तव्यास होते. ते स्टेनलेस स्टीलची भांडी आणि वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय करीत होते. त्यांचे कोणाशीही शत्रुत्व किंवा वैमनस्य नव्हते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या हत्येचे गूढ वाढले आहे. जैन हे स्कूटरवर बसलेले असताना त्यांचा पाठलाग करुन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती देण्यात आली. हा प्रसंग पदभ्रमण करणाऱ्या अनेकांनी पाहिला असून त्यांच्याकडे पोलिस चौकशी करीत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये राजधानी दिल्ली क्षेत्रात हत्यांचे प्रमाण वाढले असून पोलिसांनी या संदर्भात विशेष अभियान चालविले जाणार असून गुन्हे आणि हत्यांच्या घटना नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.









