कोल्हापूर :
उद्योगामध्ये आर्थिक अडचणीत येत झालेल्या कर्जाला कंटाळून ताराबाई पार्क येथील एका तरुण उद्योजकाने विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने आई–वडील व आपल्या मुलीची माफी मागणारी सुसाईड नोट लिहिली होती. राजीव मोहन भिंगार्डे (वय 48) असे या उद्योजकाचे नाव आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
राजीव भिंगार्डे यांनी कोल्हापुरात वाहन विक्रीचे शोरुम सुरू केले होते. मात्र यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा झाला. बॅँकांकडून घेतलेले कर्ज अंगावर बसले होते. या आर्थिक अडचणीतून गेले दोन वर्षापासून ते बाहेर पडण्याच्या प्रयत्न करीत होते. मात्र त्यांना यावर मात करता आली नाही. शनिवारी पहाटे त्यांनी विषारी इंजेक्शन आपल्या डाव्या हाताच्या शिरेत टोचून घेतले. त्यानंतर काही मिनिटात त्यांचा मृत्यू झाला. सकाळी साडे नऊ वाजले तरी मुलगा आपल्या खोलीतून बाहेर आला नसल्याने वडिलांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते बेशुध्द पडल्याचे लक्षात आले. जवळच टोचलेले मोठ्या आकाराचे इंजेक्शन पडले होते. वडिलांनी शाहूपुरी पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवला. आत्महत्येपूर्वी इंग्रजीमध्ये लिहलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.








