गणपत गल्लीतील व्यापाऱ्यांच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय : पोलीस, महापालिका आयुक्तांची भेट घेऊन देणार निवेदन
बेळगाव : गणपत गल्लीतील अतिक्रमण हटविण्यासह वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस व मनपाकडून सुरू असलेल्या कारवाईला आपला विरोध नसून पाठिंबा आहे. मात्र कारवाईच्या नावाखाली दुकानासमोरील तीन फुटात घातलेला झांप आणि इतर साहित्याला हात लावू नये. व्यापाऱ्यांनी स्वत:हून शिस्त लावून घ्यावी. दुकानाबाहेर पाच फुटांच्या पट्ट्यात थांबून व्यवसाय करणाऱ्यांना हटविल्यास कोणतीही समस्या नाही. याबाबत पोलीस आयुक्त, मनपा आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देण्याचा निर्णय गणपत गल्लीतील व्यापाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
बुधवार दि. 12 रोजी गणपत गल्लीतील दुर्गा भवनमध्ये व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष रमेश पावले होते. दिवंगत माजी आमदार व महापौर संभाजी पाटील यांच्या कार्यकाळात 1997 मध्ये गणपत गल्लीत मास्टर प्लॅन राबविण्यात आला. त्यावेळी 65 व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविली होती. त्यावेळी तत्कालीन मनपा आयुक्त बारी नवाब व दिवंगत माजी महापौर संभाजी पाटील यांनी गणपत गल्लीतील व्यापाऱ्यांशी चर्चा केली. गणपत गल्ली ही बाजारपेठेतील महत्त्वाची गल्ली असून याठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे.
त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंती केली. तसेच रस्त्यासाठी 5 फूट जागा देण्यास सांगितले. व्यापाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेत कोणतीही भरपाई न घेता जागा देऊ केली. त्यामुळे 30 फुटाचा रस्ता झाला. त्यावेळी प्रति स्क्वेअर फूटला 800 रुपयेप्रमाणे मनपाने व्यापाऱ्यांना 80 लाख रुपये द्यायचे होते. सध्या ही रक्कम 78 कोटी इतकी होते. पाच फुटांव्यतिरिक्त गटारीसाठी म्हणून आणखी तीन फूट जागा घेण्यात आली. त्यामुळे काही लहान सहान दुकाने रुंदीकरणात गेल्याने याचा धसका घेतलेल्या पाच जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे, असे संघटनेचे अध्यक्ष रमेश पावले यांनी बैठकीत सांगितले.
कारवाईच्या नावाखाली गणपत गल्लीचे नाक दाबण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा संपूर्ण बेळगाव याविरोधात तोंड उघडेल. ऊन आणि पावसापासून बचाव करून घेण्यासाठी व्यापाऱ्यांनी दुकानासमोर तीन फुटात झांप व इतर साहित्य घातले आहे. त्यामुळे याचा कोणताही परिणाम वाहतुकीवर होत नाही. दुकानासमोर पाच फुटाच्या जागेत बसलेल्या बैठे विक्रेते आणि फेरीवाले यांना हटविल्यास वाहतूक व्यवस्था आणखी सुरळीत होईल. काही व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर व्यवसाय थाटण्यासाठी भाड्याने जागा दिली असल्याने ते रस्त्यावरच ठाण मांडून बसत आहेत.
वाहतूक समस्या दूर होण्यासाठी अनेक पर्याय
गणपत गल्लीतील वाहतूक समस्या दूर होण्यासाठी अनेक पर्याय आहेत. सम-विषम पार्किंग व्यवस्था सुरू करावी. एक दिवस मोटारसायकली एका बाजूला तर बैठे विक्रेते आणि फेरीवाले एका बाजूला बसण्यास सांगितल्यास आणखी सुलभ होईल, असेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता मंगळवारी सायंकाळी जेसीबी घेऊन अधिकारी गणपत गल्लीत दाखल झाल्याने यावेळी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती म्हणाले, गणपत गल्लीत मंगळवारी केलेल्या कारवाईबाबत आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती नाही. त्यामुळे आपण मनपा आयुक्त, तसेच वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. स्थानिक नगरसेवकांना माहिती न देता केलेल्या कारवाईबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. कोणतीही कारवाई करण्यापूर्वी आपल्याशी चर्चा करावी. कोणतीही कारवाई झाल्यास स्थानिक रहिवासी आपल्याला जाब विचारतात. त्यामुळे यासंदर्भात चर्चा करण्यासाठी अधिकाऱ्यांना बोलावून बैठक आयोजित करू, असे ते म्हणाले. यावेळी गणपत गल्लीतील व्यापारी उपस्थित होते.
रिक्षाचालकांची मनमानी
सर्व व्यापाऱ्यांनी दुकानापासून तीन फूट अंतरावर आपले साहित्य मांडावे. त्याच्यापुढे कोणीही जाऊ नये. तीन फुटाबाहेर जाऊन व्यवसाय केल्यास संबंधितावर कारवाई होईल. यामध्ये संघटना सहभागी होणार नाही, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर रिक्षाचालक मनमानी पद्धतीने जागा मिळेल तेथे रिक्षा पार्क करत आहेत. तसेच गणपत गल्लीत चारचाकी आणि ऑटोरिक्षामुळे वाहतूक कोंडी होत आहे. या सर्व बाबींची माहिती देण्यासाठी लवकरच पोलीस आयुक्त व मनपा आयुक्तांची भेट घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.









