वाळपई पालिकेचा इशारा : अनेक दुकानांना नोटीस पाठवून उगारला कारवाई बडगा
वाळपई : वाळपई नगरपालिका क्षेत्रामध्ये विक्री व परवाना नसलेले व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अशा दुकानांच्या विरोधात वाळपई पालिकेने संबंधितांना नोटीस पाठवून कडक कारवाईचा बडगा उगारलेला आहे. अनेक व्यवसाय अशा बेकायदेशीरपणे सुरू आहेत. त्यांची अजिबात गय केली जाणार नाही, असा इशारा नगराध्यक्ष प्रसन्ना गावस यांनी दिला आहे. वाळपई पालिका क्षेत्रात अनेक व्यवसाय विनापरवाना सुरू आहेत. त्यामुळे पालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला असून नुकसान सोसावे लागत आहे. यामुळे कठोर कारवाईशिवाय गत्यंतर नाही, असे नगरध्यक्षा प्रसन्ना गावस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पालिकेने एक महिन्यापासून विनापरवाना सुरू असलेल्या दुकानाना नोटीस बजावण्याची कारवाई सुरू केली आहे. यामुळे संबंधित व्यावसायिकांत खळबळ निर्माण झाली आहे. नोटीस आल्यामुळे अनेकांनी नगरपालिकेच्या कार्यालयात धाव घेऊन याची विचारणा केली. वाळपई येथील सदानंद काणेकर यांच्या इमारतीमध्ये असलेल्या अनेक दुकानांना नोटिसी प्राप्त झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर काही दुकानदारांनी बुधवारी पालिका कार्यालयात याबाबत चौकशी केली असता कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करा व त्यानंतरे परवाने निश्चितच देण्यात येतील, असे आश्वासन नगराध्यक्ष प्रसन्ना गावस व मुख्याधिकारी दशरथ गावस यांनी दिली.
पालिकेचा आदेश डावलल्यास महागात पडेल!
विनापरवाना व्यवसाय कायदेशीर करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण नगरपालिकेला अशा व्यवसायातून महसूल मिळणे अत्यंत गरजेचे आहे. जर कोणी महसूल बुडवत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. आतापर्यंत ज्यांनी कागदपत्रे सोपस्कार पूर्ण केलेले आहे त्यांना परवाने दिलेले आहेत. मात्र विनापरवाना व्यवसाय चालू ठेवल्यास संबंधितांना महागात पडू शकतो, असा इशारा नगराध्यक्ष गावस यांनी दिला आहे.
पालिका क्षेत्रातील सर्व व्यावसायिकांनी सहकार्य करावे!
गेल्या एक महिन्यांपासून पालिका क्षेत्रामध्ये व्यवसाय करणाऱ्या व आतापर्यंत त्यांनी अशा प्रकारचे परवाने न घेतलेल्यांना नोटिशी बजविल्या आहेत. यापूर्वी अशा नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या. मात्र त्याची गंभीर दखल संबंधिताने घेतलेली नाही. यामुळे पालिकेने आता कठोर कारवाई करण्याच्या दृष्टिने पावले उचललेली आहेत. यासाठी पालिका क्षेत्रातील व्यावसायिकांनी रितसर परवाना घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी दशरथ गावस यांनी केली आहे.









