सांगली :
नाही नाही म्हणत यंदाही पुराच्या पाण्याने फज्ज्याला शिवल्याने सांगलीतील व्यापारीपेठा धास्तावल्या आहेत. यंदा पुन्हा एकदा महापूर येणार की काय याची व्यापाऱ्यांना धडकी भरली आहे. दरम्यान गणेशोत्सव तोंडावर असताना पुराने तोंड वर काढल्याने यंदाचा गणेशोत्सव कसा होणार याची चिंता गणेश मंडळाना लागून राहिली आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत जसजशी वाढ होईल तसतसे सांगलीत कोठे पाणी येते याबाबतचे जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पाटबंधारे यांनी २०१९च्या अभुतपुर्व महापुरावेळी मार्कंग करून ठेवले आहे. सांगलीकरांनी यापुर्वी २००५, २००६, २०१९ व २०२१ असा चार वेळेला महापुर अनुभवला. यातील २०१९चा महापुर सर्वात मोठा आणि सांगलीचे नुकसान करणारा होता. शनिवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सांगलीकरांची चिंता वाढली. गेल्या तीन दिवसात कोयना पाणलोट धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सांगलीत कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाटयाने वाढ झाली. अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्यामध्ये वाढ होवू लागल्याने सांगलीतील व्यापारी पेठाही धास्तावल्या आहेत. सांगलीच्या बाजारपेठा आणि व्यापाऱ्यांनी यापुर्वी महापुराचा वाईट अनुभव घेतलेला आहे. २००५ च्या महापुरावेळी दत्त मारूती रोडवर पाणी आले होते. पण २०१९ च्या महापुरावेळी मात्र शहरातील जवळपास सर्वच बाजारपेठांत पुराचे पाणी घुसले होते. यंदाही तशीच परिस्थिती होणार की काय अशी भिती व्यापाऱ्यांना वाटू लागली आहे. २०१९च्या महापुरावेळी सांगलीतील दत्त मारूती रोड, गणपती पेठ, हरभट रोड, स्टेशन रोड, शिवाजी मंडई, टिळक चौक, स्टॅन्ड रोड, झुलेलाल चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड तानाजी चौक, कापड पेठ मेन रोड, पटेल चौक, वखारभाग, हायस्कूल रोड, टिंबर एरिया, कॉलेज कॉर्नर, शामरावनगर, बायपास रोड, जुना बुधगाव रोड, खणभाग, रिसाला रोड, राजवाडा चौक अशा जवळपास सर्व महत्वाच्या ठिकाणी पाणी आले होते. यामुळे यंदाही बाजारपेठात पुराचे पाणी येणार की या भितीने व्यापारी वर्ग काळजीत पडला आहे








