प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेनेच्या विरोधात वाटाळ नागराज यांच्यासह काही कन्नड संघटनांनी शनिवारी पुकारलेल्या कर्नाटक बंदला बेळगावात प्रतिसाद जाणवला नाही. नेहमीप्रमाणे शहरातील सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू होते. बससेवा, हॉटेल, सरकारी कार्यालये, शाळा सुरू होत्या.
काही कन्नड संघटनांनी आरटीओ सर्कलपासून राणी चन्नम्मा चौकापर्यंत मोर्चा काढला. या परिसरात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलीस व संघटनांचे कार्यकर्ते यांच्यात वादावादीचाही प्रसंग घडला. बंदसाठी कोणीही बळजबरी करू नये, अशी पोलिसांची भूमिका होती.
मुख्य बाजारपेठेतील सर्व व्यवहार शनिवारी सकाळपासूनच सुरू होते. बाजाराचा दिवस असल्यामुळे बाजारपेठेत गर्दी होती. शहर व उपनगरातील बससेवाही सुरू होती. खबरदारी म्हणून महाराष्ट्रातील बसेस कर्नाटकात पाठविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राला जाणाऱ्या व महाराष्ट्रातून बेळगावला येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. कर्नाटक बंदचा बेळगावात फज्जा उडाला.









