कंग्राळी बुद्रुकमधील प्रवासी वर्गाचे हाल : चर त्वरित बुजविण्याची मागणी
वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
चव्हाट गल्लीतील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरजवळ मेन रस्ता नळ पाईपलाईन जोडणीसाठी फोडून चर मारल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून बसेस बंद असल्यामुळे विद्यार्थीवर्गाबरोबर प्रवाशांचेही हाल होत आहेत. ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा ग्रा. पं. ने त्वरित सदर खोदाई केलेली चर बुजवून रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्याची मागणी करण्यात येत आहे.
चव्हाट गल्लीतील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरसमोर आंबेडकर गल्लीकडून येणारी नळ पाईपलाईनसाठी रस्ता फोडून मोठी चर मारल्यामुळे गेले चार दिवस बसेसविना विद्यार्थी व प्रवासी वर्गाला केएलई हॉस्पिटल रोड व शाहूनगर रोडमार्गे दररोज 15 मिनिटाला एक अशा बसफेऱ्या धावत असतात. परंतु ग्रा. पं. ने नळपाणी पाईप लाईन जोडणीसाठी तयार केल्यामुळे बस वाहतुकीचा गेल्या चार दिवसापासून बोजवारा उडून गेला आहे. केएलईमार्गे येणारी बस कलमेश्वर सोसायटी जवळून तर शाहूनगरमार्गे येणारी बस तलावावरून परत फिरून जात होत्या.
बस चरीत रुतली
श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर समोरील रस्त्यावर खोदाई केलेल्या मेन रस्त्याच्या चरीत शुक्रवारी बस रुतून बसली. प्रवासी व गावातील नागरिकांनी दे धक्का करून बस चरीतून बाहेर काढली. याला जबाबदार ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यच असल्याचे विद्यार्थी व प्रवासी वर्गातून बोलून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रा. पं. सदस्यांनी पाईप लाईनचे काम पूर्ण केले
गेल्या चार दिवसापासून रेंगाळत चाललेले काम अखेर ग्रा. पं. सदस्य अनिल पावशे, सद्याप्पा राजकट्टी, सुरेश राठोड, जयराम पाटील, नवनाथ पुजारीसह ग्रा. पं. कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन हे पाईपलाईन जोडणीचे काम पूर्ण करून रस्ता वाहतुकीला सुरळीत केला. यामुळे विद्यार्थी व प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.









