जुन्या बसेसचा भरणा अधिक, गळक्या, मोडक्या, बसेसची दुरुस्ती गरजेची
प्रतिनिधी/ बेळगाव
पावसाळा तोंडावर आल्याने जुन्या गळक्या, मोडक्या व नादुरुस्त बसेस तातडीने दुरुस्त करा, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात नादुरुस्त गळक्या बसेसचा वापर होतो. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. हे टाळण्यासाठी परिवहनने पावसाळ्यापूर्वीच नादुरुस्त बसेसची दुरुस्ती करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
बेळगाव विभागात दैनंदिन 700 हून अधिक बसेस विविध मार्गावर धावतात. यामध्ये आयुर्मान संपलेल्या जुन्या बसेसची संख्यादेखील अधिक आहे. दरम्यान अशा बसेस रस्त्यात बंद पडणे, ब्रेक फेल होणे, टायर पंक्चर होणे, धूर सोडणे, गळती असे प्रकार वारंवार घडतात. अशा नादुरुस्त बस पावसाळ्यापूर्वीच दुरुस्त करणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यात प्रवाशांची मोठी गैरसोय होते. याची दखल घेऊन परिवहनने नादुरुस्त बसेस वेळीच दुरुस्त करणे गरजेचे आहे.
बेळगाव विभागात बसेसची कमतरता आहे. शिवाय परिवहनकडे पैशाची चणचण आहे. त्यामुळे परिवहनने बीएमटीसीच्या काही जुन्या बसेस खरेदी केल्या आहेत. त्यापैकी 50 बसेस बेळगाव विभागात धावत आहेत. आधीच नादुरुस्त बसेसची संख्या अधिक आहे. त्यातच बीएमटीसीच्या जुन्या बसेसची भर पडली आहे. त्यामुळे पावसाळ्यात जुन्या बसेसच्या तक्रारी वाढणार आहेत. तत्पूर्वी परिवहनने जुन्या बसेसची वेळीच दुरूस्ती करणे आवश्यक आहे.
बीएमटीसीकडून खरेदी केलेल्या जुन्या बसेस सध्या विविध भागात सेवा देत आहेत. मात्र काही बसेसना काचा नाहीत. त्यामुळे पाणी आत येते. तर काही बसेसचे पत्रे फाटके असल्याने गळती सुरू होते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. अशा गळक्या बसेसचीदेखील दुरुस्ती होणे गरजेचे आहे. तर खुळखुळ्या झालेल्या बसेस ग्रामीण भागात सोडल्या जातात. त्यामुळे प्रवाशांबरोबर विद्यार्थ्यांचे देखील हाल होतात. विशेषत: पावसाळ्यात प्रवाशांना भिजतच प्रवास करावा लागतो. त्यामुळे बसेसची दुरुस्ती करून सुसज्ज बसेस ग्रामीण भागात पाठवाव्यात, अशी मागणी प्रवाशांतून होऊ लागली आहे.
गतवर्षी बिजगर्णी येथे बसचा टायर निखळून दुर्घटना घडली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सातत्याने बस बंद पडणे, ब्रेक फेल होणे असे प्रकार घडू लागले आहेत. नादुरुस्त बस पाठविल्या जात असल्याने हे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून सुस्थितीत असलेल्या बसेस परिवहनने पाठवाव्यात, अशी मागणी ग्रामीण भागातून होऊ लागली आहे.
के. के. लमाणी (डीटीओ केएसआरटीसी)
बसेसची कमतरता असल्याने काही भागात जुन्या बसेस पाठविल्या जात आहेत. सुस्थितीत असलेल्या बसेसच सेवेत वापरल्या जात आहेत. काही वेळा बसेस बंद पडण्याचे प्रकार घडू शकतात. मात्र अशा वेळेला त्या ठिकाणी पर्यायी बसेसची व्यवस्था केली जाते. एकूणच बेळगाव विभागात बसेसची सेवा चांगल्या प्रकारे दिली जात आहे.









