एकूण 50 बस दाखल, बससेवेवरील ताण काहीसा कमी
बेळगाव : परिवहनच्या ताफ्यात टप्प्याटप्याने नवीन बस दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत 50 बसेस आल्या आहेत. त्यामुळे बस कमतरतेची समस्या काहीअंशी कमी होणार आहे. बेळगाव विभागात बसच्या तुटवड्यामध्ये सार्वजनिक बस वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यातच शक्ती योजनेचा ताण वाढल्याने बससेवेचे तीनतेरा वाजले आहेत. मात्र आता मागील दोन महिन्यात टप्प्याटप्याने 50 बसेस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे बस सेवेवरील काहीचा ताण कमी होणार आहे. मध्यवर्ती बस स्थानकातून दररोज 650 हून अधिक बसेस विविध मार्गावर धावतात. काही लांब पल्ल्यासाठी तर काही स्थानिक मार्गावर सेवा देतात. मात्र प्रवाशांच्या तुलनेत बससेवा कमी असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती.
विशेषत: मागील जूनपासून महिलांचा मोफत प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे महिलांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे बससेवेवर अतिरिक्त ताण वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून परिवहनला 50 बसेस देण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही आणखी 100 बसेसची गरज असल्याचे बोलले जात आहे. कोरोना काळात परिवहनला मोठा तोटा सहन करावा लागला होता. त्यामुळे परिवहनची तिजोरी रिकामी झाली होती. नवीन बसेस खरेदी करणे अशक्य होते. अशा परिस्थितीत बीएमटीसीकडून केवळ 1 लाख रुपयांत जुन्या बसेस खरेदी करण्यात आल्या होत्या. मात्र त्या सेवा देताना कमी पडू लागल्या आहेत. दरम्यान परिवहनने राज्य सरकारने नवीन बसेसची मागणी केली होती. त्यानुसार परिवहनच्या ताफ्यात टप्प्याटप्याने बस दाखल झाल्या आहेत.









