साधसंगत गुरुद्वारा समितीतर्फे बसचे स्वागत : बसच्या मार्गावर फुलांच्या पायघड्या
बेळगाव : शीखांचे नववे गुरु तेजबहाद्दूर साहिबजी यांच्या 350 व्या बलिदान वर्षानिमित्त आसामच्या डुब्री येथून दोन बस देशाच्या विविध भागातून प्रवास करत गुरुद्वारांमध्ये दाखल होत आहेत. या बस हैदराबाद, बेंगळूर, हुबळी असा प्रवास करत मंगळवार दि. 30 रोजी बेळगावमध्ये दुपारी दाखल झाल्या. बेळगावच्या साधसंगत गुरुद्वारा समितीतर्फे चन्नम्मा सर्कल येथे या बसचे स्वागत करण्यात आले. गुरुद्वारा समितीचे पदाधिकारी आणि शीख समाजाच्या नागरिकांनी उत्साहात बसचे स्वागत केले. कॅम्पमार्गे या बस गोवावेस येथील गुरुद्वारामध्ये दाखल झाल्या. तेथे शबद कीर्तन झाले. बसच्या मार्गावर फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. बसमधील गुरु गोविंद साहिब यांच्या प्रतिमेचे तसेच ग्रंथाचे दर्शन घेण्यासाठी एकच झुंबड उडाली. सर्वांनाच लंगर अर्थात प्रसाद वितरण करण्यात आला. सदर बस बेळगावहून कोल्हापूर, पुणे, बिदर,नांदेड पुढे मुंबई असा प्रवास करणार आहेत.










