जुन्या बसपासची मुदत संपली : नवीन बसपास मिळविण्याकडे दुर्लक्ष
बेळगाव : विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने जुन्या बसपासची मुदत 30 जूनपर्यंत वाढविली होती. मात्र या कालावधीत विद्यार्थ्यांनी बसपास काढले नसल्याने आता तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड बसत आहे. दरम्यान बसपाससाठी अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवासात मुभा दिली जात आहे. मात्र ज्याच्याकडे पास नाहीत, अशा विद्यार्थ्यांना पैसे मोजावे लागत आहेत. दरवर्षी शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला की बसपास प्रकियेला सुरुवात होते. यंदाही बसपास प्रकियेला वेळेत सुरुवात झाली आहे. मात्र केवळ 5 हजार विद्यार्थ्यांनीच बसपाससाठी अर्ज दाखल केले आहेत. तर केवळ 1500 विद्यार्थ्यांना बसपासचे वितरण करण्यात आले आहे. मागील दोन वर्षांपासून बसपास प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे. बसपाससाठी सेवासिंधू पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागत आहे. ही प्रकिया थोडी किचकट आणि वेळकाढू असल्याने विद्यार्थी बसपास काढण्याबाबत निऊत्साही असल्याचे दिसत आहेत. बेळगाव विभागात दरवर्षी 76 हजारहून अधिक विद्यार्थी बसपास काढतात. मात्र मागील दोन वर्षांत कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले होते. त्यामुळे बसपास प्रक्रियादेखील विस्कळीत झाली होती. यंदा बसपास प्रक्रिया सुरळीत झाली आहे. सेवासिंधूवर अर्ज दाखल केल्यानंतर सदर प्रत बसपास विभागात जमा करणे आवश्यक आहे. यंदा मुलींना मोफत बसप्रवास करता येणार असल्याने परिवहनला बसपासच्या माध्यमातून मिळणाऱ्या अधिक उत्पन्नापासून दूर रहावे लागणार आहे.
पाससाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनाच सवलत
बसपाससाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना आठ दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. या कालावधीत अर्ज केलेली शुल्क पावती दाखवून प्रवास करता येणार आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांनी बसपास काढले नाहीत, त्यांना तिकीट काढूनच प्रवास करावा लागणार आहे.
– ए. वाय. शिरगुप्पीकर (डेपो मॅनेजर)









