नवीन लाईनसाठी खोदण्यात आल्याने समस्या : रहिवाशांसह प्रवाशांवर परिणाम
बेळगाव : अनगोळ एस. व्ही. रोड चिदंबरनगर क्रॉस येथे ड्रेनेज चेंबर घालण्यासाठी खोदण्यात आलेल्या चरीत परिवहन मंडळाची बस अडकल्याने समस्या निर्माण झाली. चिदंबरनगर क्रॉस ते एस. व्ही. रोड विघ्नहर्ता गणपती मंदिर समोरील डेनेजलाईन लहान व चेंबर खराब झाल्याने चेंबर भरण्याचे प्रकार वारंवार घडत होते. त्यामुळे या भागातील नगरसेविका खुर्शीदा मुल्ला यांच्या प्रयत्नाने याठिकाणी नवीन डेनेजलाईन घालण्याचे काम सुरू होते. मात्र शनिवारी सकाळी बस खोदण्यात आलेल्या चरीत अडकली. यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.
अनगोळची बससेवा ही 34 क्रमांक मराठी शाळेपर्यंत सुरू करण्यात आली आहे. विद्यानगर क्रॉसपासून चिदंबरनगर येथून वळसा घेऊन अनगोळ मुख्य रस्त्यावरील शाळेसमोर बसेस थांबविण्यात येतात. दरम्यान, चिदंबरनगर क्रॉस येथून वळसा घेताना बसचे समोरील चाक हे चेंबर व पाईपलाईनच्या चरीत रुतून बसल्याने बस चरीत अडकली. यामुळे बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांची गैरसोय झाली. काही वेळानंतर बस ओढून काढण्यात आली.
कंत्राटदाराने लक्ष देण्याची मागणी
चेंबरचे बांधकाम योग्यरित्या झाल्यामुळे या रस्त्यावरून बस वाहतूक सुरू करण्यात आली होती. पण पाईपलाईनची चर व्यवस्थितपणे भराव टाकून बुजविण्यात न आल्याने सदर बस चरीत अडकली. बस बाहेर काढल्यानंतर कंत्रादाराकडून सदर चरीत दगडी भराव टाकून बुजविण्याचे काम करण्यात आले. या घटनेमुळे प्रवाशांसह या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागला. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कंत्राटदाराने लक्ष देण्याची मागणीही होत आहे.
कुरबर गल्ली येथे चिखलाचे साम्राज्य
गणेशोत्सव तोंडावर आला असताना कुरबर गल्ली येथे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या भागात नवीन डेनेजलाईन घालण्यात आली आहे. मात्र खोदलेल्या चरीमध्ये केवळ माती ओढण्यात आल्याने ठिकठिकाणी मातीचे ढिगारे दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे गल्लीत सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे रहिवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गल्लीतील नागरिकांना गणेशोत्सव चिखलामध्ये साजरा करण्याची वेळ येते की काय? असा प्रश्न पडला आहे.









