प्रवाशी-जनतेतून समाधान : महानगरपालिका कर्मचाऱ्यांची कारवाई
बेळगाव : सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील आंबेडकर उद्यानाच्या समोरच्या बाजूला असलेला बसथांबा जीर्ण झाला होता. तो कधी कोसळेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे बसथांबा हटविण्याची मागणी संतोष दरेकर यांनी महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याकडे केली. त्यानंतर मंगळवारी दुपारीच तेथील बसथांबा हटविण्यात आला आहे. महानगरपालिकेने विविध ठिकाणी उभे केलेले बसथांबे खराब झाले आहेत. बऱ्याच वर्षापूर्वी त्याची उभारणी करण्यात आली होती. कडोली, कंग्राळी तसेच इतर परिसरात जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा बसथांबा उभा करण्यात आला होता. मात्र तो धोकादायक बनला होता. लोखंडी पाईप तसेच लोखंडी पत्रे गंजून गेले होते. त्यामुळे कधी कोसळेल हे सांगता येत नव्हते. अनर्थ टळण्यापूर्वीच हा बसथांबा हटवावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांसह मनपा आयुक्तांकडे करण्यात आली होती. दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान महानगरपालिकेचे कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यानंतर तो बसथांबा हटविला आहे. यामुळे प्रवाशांतून तसेच जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.









