गुटखा खाऊन थुंकल्याने भिंती-आसनांची दुर्दशा : ग्रा. पं.चेही दुर्लक्ष
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या हाकेच्या अंतरावर असलेला स्मार्ट बसथांबा समाजकंटकांकडून स्टार गुटखा खाऊन थुंकल्याने घाणेरडा बनला आहे. त्यामुळे प्रवासी वर्गाने बसथांब्याकडे पाठ फिरवली आहे. यामुळे सदर बसथांबा प्रवासी वर्गासाठी कुचकामी ठरला आहे. परिणामी शासनाचेही लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. ग्रा. पं. ने बसथांब्याच्या दुर्दशेकडे त्वरित लक्ष देऊन स्टार गुटखा थुंकून घाण करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करून बसथांब्याचे पूर्वीचे वैभव प्राप्त करून प्रवासी वर्गासाठी सदर बसथांबा सोयीस्कर करण्याची मागणी करण्यात येत आहे.
शासनाचे लाखो रुपये वाया
केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांपासून शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात स्मार्ट बसथांबे उभारुन गावच्या वैभवामध्ये भर घालण्याचे कार्य सुरू केले आहे. बसथांब्यामुळे उन्हात व पावसात ताटकळत थांबणाऱ्या प्रवाशी वर्गाला बसच्या प्रतीक्षेत थांबण्यासाठी चांगली सोय झाली आहे. यातीलच एक भाग म्हणून कंग्राळी बुद्रुक गावामध्येही गेल्या पाच वर्षांपूर्वी ग्रा. पं. कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर शासनाने लाखो रुपये खर्च करून स्मार्ट बसथांब्याची उभारणी केली. यामुळे गावच्या वैभवामध्ये चांगली भर पडली. परंतु थोड्या दिवसातच बसथांब्यामध्ये समाजकंटकांकडून स्टार गुटखा खाऊन तेथेच थुंकून सर्वत्र घाण केली आहे. त्यातच प्रवासी वर्गासाठी बसण्यासाठी असलेल्या खुर्च्यांचीही मोडतोड केलेली आहे. परंतु बसथांब्याच्या देखरेखीकडे पहायला कुणालाच वेळ नाही. यामुळे सदर बसथांबा प्रवासी वर्गाविना कुचकामी ठरला आहे.
देखभालीसाठी वेळ नाही?
सदर स्मार्ट बसथांबा ग्रा. पं. कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर आहे. सदस्यांना ग्रा. पं. कार्यालयाकडे जाताना बसथांब्याची झालेली दुर्दशा दिसते. परंतु एकाही सदस्याने बसथांब्याच्या दुर्दशेबद्दल विचार केला नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. शासकीय मालमत्तेची एखाद्याकडून नुकसान होत असेल तर त्वरित शासकीय मालमतेचे संरक्षण करणे ही सदस्यांची बाब असते. परंतु सदर बसथांब्याची समाजकंटकांकडून दुर्दशा होऊनसुद्धा सर्वजण डोळेझाक केल्यामुळे नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होताना दिसत आहे.









