बेळगाव : काही दिवसांपासून शहर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. परिणामी बसस्थानकामध्ये आसरा घेण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती. दरम्यान कॅम्प येथील स्मार्ट सिटी अंतर्गत निर्माण केलेल्या बसस्थानकावर पावसाच्या पाण्यामुळे रान उगवल्याचे दिसून आले आहे. काहीवेळा दुर्लक्षित बसस्थानकांवर अशा प्रकारे रान उगवत असल्यास संबंधीत विभागाने याकडे लक्ष देऊन त्याची तातडीने साफसफाई करून घेण्याची मागणी प्रवाशांसह नागरिकांतून होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात कमीजास्त पाऊस होत आहे. कॅम्प परिसरात विविध प्रकारची मोठी झाडे असल्याने पावसाच्या पाण्यामुळे त्यांच्या बिया बसस्थानकांवर पडतात.
जास्त दिवस तसेच पडून राहिल्याने व पावसामुळे त्या बियांना कोंब फुटून त्याचे रुपांतर रानामध्ये झाले आहे. परिणामी बसस्थानकांच्या छतांवर मोठ्या प्रमाणात रान दिसून येत आहे. यामुळे स्मार्ट सिटी बसस्थानकांचा बोजा वाढला आहे. त्यामुळे बसस्थानकांना धोका उद्भवू शकतो. स्मार्ट सिटी योजनेतंर्गत शहर परिसरात अनेक ठिकाणी बसस्थानके निर्माण करण्यात आली आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचेही दिसून येत आहे. परिणामी एकीकडे बसस्थानकांमध्ये भटक्या जनावरांचा वावर तर काही ठिकाणी बसस्थानकांवर रान उगवल्याचे दिसून येत आहे. याचा प्रवाशांसह नागरिकांवर परिणाम होत आहे. यासाठी संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.









