पणजी : दक्षिण गोवा जिह्यासाठी मडगाव येथे रु. 250 कोटी खर्च करुन नवीन अत्याधुनिक बसस्थानक उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पीपीपी म्हणजे सार्वजनिक – खासगी भागिदारीतून तो साकारण्यात येणार आहे. त्या स्थानकात विविध वाहनांसाठी पार्किंग सुविधा देण्यात येणार असून 500 दुचाकी 100 चारचाकी पार्क करता येतील. एकूण 4500 चौ.मी. क्षेत्रात सदर बसस्थानक उभारण्याची योजना आहे. प्रवासी वर्गासाठी वातानुकूलीत प्रतिक्षागृह दिले जाणार असून मोफत वायफाय सुविधा मिळणार आहे.
लहान मुलांच्या स्तनपानासाठी महिलांकरीता स्पेशल रुम दिली जाणार आहे. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह देण्यात येणार असून पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध केली जाणार आहे. मदत व माहिती कक्ष दिला उभारण्यात येणार असून तेथे प्रवाशांसाठी विविध बसगाड्यांची संपूर्ण माहिती मिळणार आहे. व्हिलचेअर्स, लगेज ट्रॉली, खाद्यपदार्थ स्टॉल्स, शॉपिंग सेंटर्स यांचीही सोय उपलब्ध करण्यात येणार आहे.
सरकारने सदर बसस्थानकासाठी निविदा जारी केली आहे. मडगावच्या विद्यमान बसस्थानकाचा कायापालट करुन हा बदल होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यात सर्व साधन – सुविधा देण्यात येणार असून केटीसी डेपो, इंधन स्टेशन, वर्कशॉप, बसथांबा, वाहने जाण्या-येण्याची वेगळी सोय, इतर राज्यातील बसगाड्यांसाठी वेगळी व्यवस्था अशी यंत्रणा नवीन बसस्थानकात उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.









