रणकुंडये मार्गावरील प्रकार : रात्रीच्यावेळी बसप्रवास करणे धोकादायक : प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
बेळगाव : परिवहनच्या ताफ्यात बसेसचा तुटवडा असल्याने नादुरुस्त आणि आर्युमान संपलेल्या बसेसचा वापर होऊ लागला आहे. सोमवारी रात्री रणकुंडये मार्गावर हेडलाईट बंद असलेली बस सोडण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे. विविध मार्गावर नादुरुस्त बस चालविल्या जात असल्याने बसचा प्रवास आता असुरक्षित होऊ लागला आहे. शासन आणि परिवहन मंडळ गांभीर्य घेणार का? हेच आता पहावे लागणार आहे.
परिवहनकडे बसेसची कमतरता असल्याने विविध मार्गावर नादुरुस्त बस सोडल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. बेळगाव-रणकुंडये बस हेडलाईट नसतानाच सोडण्यात आली. अशा प्रकारामुळे अपघाताची चिंता व्यक्त होत आहे. आधीच शक्तीयोजनेमुळे बससेवेवर प्रवाशांचा अतिरिक्त ताण वाढला आहे. त्यामुळे बसेसमध्ये गर्दी वाढू लागली आहे. त्यातच प्रवासादरम्यान टायर पंक्चर होणे, टायर फुटणे, धूर सोडणे, रस्त्यात बंद पडणे, हेडलाईट बंद असलेल्या बसेस सोडणे असे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे बसचा प्रवास धोकादायक ठरू लागला आहे. आता तरी परिवहनला जाग येणार का? असा प्रश्नही पडू लागला आहे.
मध्यवर्ती बसस्थानकातून दररोज 650 हून अधिक बसेस विविध मार्गावर सेवा देत आहेत. मात्र प्रवाशाच्या तुलनेत या बसेसची संख्या कमी आहे. त्यामुळे प्रवाशांना चेंगराचेंगरी करत प्रवास करावा लागत आहे. त्यातच परिवहनकडून जुन्या नादुरुस्त बस पाठविल्या जात आहेत. त्यामुळे परिवहनच्या बसचा प्रवास दिवसेंदिवस असुरक्षित होऊ लागला आहे. परिवहनच्या ताफ्यात 50 हून अधिक जुन्या बसेस आहेत. त्यामुळे प्रवासादरम्यान ब्रेक फेल होणे, रस्त्यात मधोमध बंद पडणे असे प्रकार पहावयास मिळत आहेत. त्याबरोबर आता हेडलाईट बंद असलेल्या बसेसही सोडल्या जात आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेला धोका निर्माण होऊ लागला आहे.
जुन्या नादुरुस्त बस रस्त्यावर
भंगारात काढलेल्या बस गाड्या विविध मार्गांवर सेवा देत असल्याने अडचणी वाढू लागल्या आहेत. परिवहनकडे निधीची चणचण असल्याने नवीन बस खरेदी करणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत जुन्या बसेसवरच परिवहनचा डोलारा सुरू आहे. मात्र प्रवासादरम्यान अशा जुन्या बसेस धोकादायक ठरू लागल्या आहेत. त्यामुळे परिवहनच्या बसच्या प्रवासाबाबत आता चिंता व्यक्त होऊ लागली आहे. शिवाय दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.









