सार्वजनिक बससेवेचे तीनतेरा : अनियमित बससेवेमुळे प्रवाशांची गैरसोय, परिवहन महामंडळाची डोकेदुखी
बेळगाव : प्रवाशांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ, शैक्षणिक आणि पर्यटन हंगाम व हिवाळी अधिवेशन आदी कारणांमुळे सार्वजनिक बससेवेचे तीनतेरा वाजले आहेत. दैनंदिन बससेवा अपुरी आणि अनियमित होत असल्याने प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होऊ लागली आहे. बससेवेवर वाढलेल्या अतिरिक्त ताणामुळे प्रवाशांना तासन्तास ताटकळत थांबावे लागत आहे. याबाबत हिवाळी अधिवेशनात चर्चा होऊन बस तुटवड्याचा प्रश्न मार्गी लागणार का? हेच पहावे लागणार आहे. मागील वर्षापासून शक्ती योजनेंतर्गत महिलांचा मोफत प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. हा अतिरिक्त प्रवाशांचा ताण बससेवेवर पडू लागला आहे. त्यामुळे दैनंदिन बसप्रवास त्रासदायक ठरू लागला आहे.
नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात पर्यटनस्थळे आणि शैक्षणिक सहलींचे नियोजन केले जाते. विशेषत: शाळांकडून सहलींसाठी परिवहनची बसच बुकिंग केली जाते. मात्र, सद्यस्थितीत शक्ती योजना आणि अधिवेशनामुळे शैक्षणिक सहलींचा हंगामही अडचणीत येऊ लागला आहे. 9 ते 19 डिसेंबर दरम्यान बेळगावात हिवाळी अधिवेशन भरविले जात आहे. या अधिवेशनासाठी 54 बसेस देण्यात आल्या आहेत. त्यामुळे इतरत्र मार्गावर बसेसचा तुटवडा जाणवू लागला आहे. स्थानिक बसफेऱ्या कमी करून अधिवेशनासाठी बस पुरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे विविध मार्गावर बसेसचा अभाव दिसून येत आहे. एकूणच शैक्षणिक सहलींचा हंगाम, शक्ती योजना आणि सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामुळे परिवहनच्या बससेवेवर अतिरिक्त ताण वाढल्याचे दिसत आहे. मात्र, यामध्ये सर्वसामान्य प्रवासी भरडला जात आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे मध्यवर्ती बसस्थानकात बसथांबे आणि आसनांची कमतरताही जाणवू लागली आहे. प्रवाशांना बसथांबे सोडून भर उन्हात थांबावे लागत आहे. मध्यवर्ती बसस्थानकात पुरुषांपेक्षा महिला प्रवाशांची संख्या अधिक दिसत आहे.









