यात्रेसाठी अतिरिक्त बस : प्रवाशांची गैरसोय दूर
बेळगाव : मोहनगा-दड्डी यात्रेसाठी बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून गुरुवारपासून विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. पुढील दोन दिवस म्हणजे शनिवारपर्यंत ही बससेवा सुरू राहणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने बेळगाव-दड्डी मार्गावर जादा बसची व्यवस्था केली आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी बेळगाव येथून दड्डीकडे 20 बसेस धावल्या. मोहनगा-दड्डी यात्रेसाठी बेळगावातून जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. यासाठी बेळगाव-दड्डी मार्गावर जादा बस सोडण्यात आल्या आहेत. बेळगाव-दड्डी फुल तिकीट 90 रुपये तर हाफ 45 रुपये आकारले जात आहेत. विशेषत: महिलांना शक्ती योजनेंतर्गत मोफत प्रवास दिला जात आहे.
बेळगावसह महाराष्ट्र आणि कोकणातूनही दड्डी यात्रेला जाणाऱ्या भक्तांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची गर्दी होऊ लागली आहे. शुक्रवार दि. 14 रोजी या यात्रेचा मुख्य दिवस असल्याने प्रवाशांची गर्दी पुन्हा वाढणार आहे. शिवाय बेळगाव-दड्डी मार्गावर जादा बस सोडाव्या लागणार आहेत. सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत या मार्गावर जादा बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. यात्रा-जत्रांना विविध ठिकाणी प्रारंभ झाल्याने बससेवेवर अतिरिक्त ताण वाढला आहे. त्यामुळे दैनंदिन शहर आणि ग्रामीण भागातील बससेवा विस्कळीत होऊ लागली आहे. यावेळी डेपो मॅनेजर ए. वाय. शिरगुप्पीकर, एटीएम प्रसाद वस्त्रदमा, कंट्रोलर एस. जी. देविनकट्टी, टीसी एम. वाय. बेळूर, अनंतकुमार, अण्णीकेरी, ए. ए. कामत यासह चालक, वाहक उपस्थित होते.









