कर्नाटक-महाराष्ट्र, गोवा राज्यांची बससेवा सुरळीत, प्रवाशांना दिलासा : उत्पन्नातही झाली हळूहळू वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना आणि महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱयांचा संप काहीअंशी पाठीमागे घेण्यात आल्याने कर्नाटक-महाराष्ट्र दोन्ही राज्यांची बससेवा पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे मागील अडीच वर्षात बससेवा विस्कळीत झाली होती. परिणामी परिवहनचे उत्पन्नही ठप्प झाले होते. आता पुन्हा बससेवा विविध मार्गांवर धावू लागल्याने उत्पन्नही पूर्वपदावर येत आहे.
कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यानंतर मागील चार महिन्यांपासून बससेवा सुरू झाली आहे. मात्र महाराष्ट्रात कर्मचाऱयांचा संप सुरू असल्यामुळे महाराष्ट्राची लालपरी जाग्यावर थांबून होती. आता लालपरीही विविध मार्गांवर सुसाट धावू लागली आहे. त्यामुळे विशेषतः सीमाहद्दीवरील बेळगाव, हुक्केरी, चिकोडी, संकेश्वर, अथणी तालुक्मयातील प्रवाशांची सोय झाली आहे. याबरोबरच कोकणातूनही लालपरी बेळगावकडे येऊ लागल्याने कोकण-बेळगाव प्रवास सुखकर झाला आहे.
बससेवा ठप्प झाल्याने महसुलावर परिणाम
बेळगाव जिल्हय़ाला महाराष्ट्र आणि गोवा राज्य लागून असल्याने बेळगाव विभागाचा महसूल हा महाराष्ट्र आणि गोवा राज्यात धावणाऱया बसवर अवलंबून आहे. बेळगाव विभागातील एकूण उत्पन्नापैकी 40 टक्के उत्पन्न हे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून धावणाऱया बसच्या माध्यमातून प्राप्त होते. मात्र कोरोनामुळे मागील काही महिन्यात राज्यांतर्गत आणि आंतरराज्य बससेवा ठप्प झाली होती. त्यामुळे महसुलावर मोठा परिणाम झाला होता. विशेषतः महाराष्ट्र आणि गोवा राज्यात धावणारी बससेवा ठप्प झाल्याने महसूल थांबला होता. आता कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यानंतर सीमाहद्दीवरील आरटीपीसीआरची सक्ती रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटकाच्या बस महाराष्ट्र आणि गोव्यात धावत आहेत. तर महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या बसदेखील कर्नाटकच्या विविध मार्गांवर सुसाट धावताना दिसत आहेत. त्यामुळे तिन्ही परिवहनचे उत्पन्न हळूहळू वाढू लागले आहे.
कर्नाटकच्या विविध भागात लालपरी सुसाट...
कर्मचाऱयांचा संप कमी होत असल्याने विविध मार्गांवर बससेवा पूर्ववत सुरू झाली आहे. शिवाय कर्नाटकच्या विविध भागातही लालपरी सुसाट धावत आहे. राज्यांतर्गत बससेवेबरोबर आंतरराज्य मार्गावर बस धावत आहेत. बेळगाव, निपाणी, चिकोडी, हुक्केरी, गोकाक, विजापूर आदी कर्नाटकच्या भागात बससेवा सुरू झाली आहे.
– रोहन पलंगे (विभागीय नियंत्रक, कोल्हापूर)
संप मागे घेतल्याने कर्नाटकच्या बस विविध मार्गांवर…
मागील चार महिन्यांपासून राज्याबरोबर महाराष्ट्रातही बससेवा सुरळीत सुरू झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सातारा आदींसह महाराष्ट्राच्या इतर भागातही बस धावत आहेत. महाराष्ट्रातील कर्मचाऱयांनी संप मागे घेतल्याने कर्नाटकच्या बस विविध मार्गांवर धावत आहेत.
– पी. वाय. नाईक (विभागीय नियंत्रक, बेळगाव)









