अनियमित-अपुरी बससेवा : विद्यार्थी-प्रवाशांची गैरसोय : परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन : तोडगा न काढल्यास आंदोलन
वार्ताहर/किणये
बिजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप भागात बससेवेचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. या भागात अनियमित व अपुऱ्या बसफेऱ्या आहेत. यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल होऊ लागले आहेत. गेल्या सहा महिन्यापासून ही समस्या निर्माण झाली आहे. तरीही याकडे राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे बिजगर्णी ग्रामपंचायतीतर्फे गुरुवारी राज्य परिवहन मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावर लवकर तोडगा काढावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी दिला आहे. बिजगर्णी परिसरात बससेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. बस केव्हा येते, कधी येते याचा काहीच नेम नाही. यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांना तासन्तास बस थांब्यावर ताटकळत बसावे लागत आहे.
पालकांच्या चिंतेत भर
बससेवा अनियमित व अपुऱ्या असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजला वेळेवर पोहोचता येत नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशा तक्रारी पालक वर्गातून होत आहेत. शाळा, कॉलेज संपल्यावर मुलं घरी लवकर येत नाहीत याला कारण आणि जबाबदार केवळ आणि केवळ बस सेवाच आहे. त्यामुळे विद्यार्थी लवकर येत नाहीत यामुळे पालकवर्गांची चिंताही वाढली आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
काळेवाडी, बिजगर्णी, राकसकोप, बेळवट्टी, इनाम बडस, बाकनूर या भागातील विद्यार्थी रोज बेळगावला शाळा हायस्कूल व कॉलेजला येतात. मात्र, त्यांना वेळेवर बस उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांना विविध कामानिमित्त बेळगावला यावे लागते. वेळेवर बस मिळत नसल्याने त्यांनाही याचा फटका बसत आहे. बससेवा सुरळीत चालू करावी. यासाठी बिजगर्णी ग्रामपंचायतीतर्फे गुरुवारी विभागीय नियंत्रण अधिकारी राजेश हुद्दार यांना निवेदन दिले. यावेळी ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष अॅड. नामदेव मोरे, माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य मनोहर बेळगावकर, सदस्य महेश पाटील, लक्ष्मण कांबळे, विलास पाटील, भावकू मासेकर, ज्योतिबा पाटील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









