परिवहनकडून आदेश : येत्या शैक्षणिक वर्षापासून वितरण : जवळच्या ऑनलाईन केंद्रात सुविधा उपलब्ध
बेळगाव : विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बेळगाव वन, कर्नाटक वन आणि ग्राम वन केंद्रात बसपास वितरित केले जाणार आहेत. जवळच्या ऑनलाईन केंद्रात ही सुविधा उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांचे मध्यवर्ती बसस्थानकात होणारे हेलपाटे थांबणार आहेत. यासाठी परिवहनने हिरवा कंदील दिला असून येत्या शैक्षणिक वर्षापासून ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. परिवहन महामंडळाकडून विद्यार्थ्यांना मोफत/सवलतीच्या दरात बसपास वितरित केले जातात. बेळगाव विभागात दरवर्षी 76 हजारहून अधिक विद्यार्थी बसपास काढतात. मात्र मागील दोन वर्षापासून बसपास प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान ऑनलाईन अर्ज देऊनदेखील विद्यार्थ्यांना बसस्थानकात महिनाभर प्रतीक्षा करावी लागते. शिवाय बसस्थानकात बसपाससाठी झुंबड उडते. यासाठी परिवहनने बसपास वितरणाचे काम बेळगाव वन, कर्नाटक वन आणि ग्राम वन कार्यालयाकडे सोपवले आहे.
विद्यार्थ्यांचे हेलपाटे थांबणार
शासनाने शासकीय कागदपत्रे तातडीने मिळावीत, यासाठी प्रत्येक गावात ग्राम वन सेवाकेंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रात आता बसपास वितरणाचे काम देखील चालणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता बसपास गावातच उपलब्ध होणार आहे. सेवा सिंधू पोर्टलवर अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी त्याच ठिकाणी बसपास उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे बसस्थानकाकडे यायचे हेलपाटे थांबणार आहेत. शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला की, बसपास वितरण प्रक्रियेलादेखील सुरुवात होते. मागील दोन वर्षात कोरोनामुळे शैक्षणिक वर्ग सुरळीत भरले नाहीत. त्यामुळे बसपास वितरण प्रक्रियाही सुरळीत पार पडली नाही. मात्र यंदा शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाल्यानंतर बसपास वितरण प्रक्रियेलादेखील सुरुवात होणार आहे. शिवाय ऑनलाईन केंद्रावर ही प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना लवकर बसपास उपलब्ध होतील. त्यामुळे गैरसोय टळणार आहे.
य् ांदा ऑनलाईन केंद्रावरच बसपासचे काम
विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी बेळगाव वन, कर्नाटक वन आणि ग्राम वनमध्ये बसपास वितरण प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन केंद्रावरच बसपासचे काम चालणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.
के. के. लमाणी (डीटीओ, केएसआरटीसी)









