मृतांमध्ये 2 मुलांचा समावेश : विदेशी पर्यटक करत होते प्रवास
वृत्तसंस्था/ व्हेनिस
इटलीच्या व्हेनिस शहरात एक बस ओव्हरपासवरून खाली कोसळल्यानंतर त्यात आग लागली. या दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 2 मुलांचा देखील समावेश आहे. तर 18 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यातील 4 जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
बसमधून एकूण 40 जण प्रवास करत होते. प्रवाशांमध्ये युक्रेनियन नागरिकांसमवेत विदेशी पर्यटकांचा समावेश होता. बस मेस्त्रsच्या रेल्वेमार्गानजीक कोसळली होती. हा रेल्वेमार्ग ब्रिजद्वारे व्हेनिसशी जोडला गेला आहे. बस 50 फुटांच्या उंचीवरून विजेच्या वाहिन्यांवर कोसळल्याने त्यात आग लागल्याचे समजते. दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट नाही. परंतु 40 वर्षीय इटालियन बसचालक दुर्घटनेपूर्वी आजारी होता असे आढळून आल्याची माहिती व्हेनिस शहराचे पदाधिकारी रेनाटो बोरासो यांनी दिली आहे.
दुर्घटनेच्या पीडितांपैकी 5 जण युक्रेनियन आणि एक जण जर्मन नागरिक होता. बसमधील प्रवाशांमध्ये फ्रान्स तसेच क्रोएशियाचे नागरिक होते. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले होते, परंतु तोपर्यंत बस पूर्णपणे जळाली होती असे अंतर्गत मंत्रालयाचे स्थानिक प्रतिनिधी प्रीफेक्ट मिशेल डी बारी यांनी सांगितले आहे.
इटलीच्या पंतप्रधान जियॉर्जिया मेलोनी आणि व्हेनिसचे महापौर लुइगी ब्रुगनारो यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. दुर्घटनेतील पीडित, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांसोबत सरकारच्या संवेदना आहेत. या दुर्घटनेप्रकरणी महापौर लुइगी ब्रुगनारो आणि परिवहन मंत्री माटेओ साल्विनी यांच्या संपर्कात असल्याचे पंतप्रधान मेलोनी यांनी सांगितले आहे.









