जळगाव / प्रतिनिधी :
नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी गडावरून खामगावला निघालेली बस गडाच्या गणेश घाटावरून 400 फूट दरीत कोसळली. अपघातात जळगाव जिल्हयातील एक महिला ठार झाली असून, 21 जण जखमी झाले आहेत.
रात्री मुक्कामी असलेली खामगाव आगाराची बस सप्तशृंगी गडावरून आज सकाळी खामगावच्या दिशेने निघाली होती. 6.50 वाजण्याच्या सुमारास गडाच्या गणपती घाटावरून बस थेट 400 फुट दरीत कोसळली. बसमध्ये 22 प्रवासी होते. अपघात होताच ग्रामस्थांनी मदत कार्य सुरू केले. जखमींना वणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तर गंभीर जखमींना नाशिक जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले. या अपघातात आशाबाई राजेंद्र पाटील (वय 55 रा. मुडी. ता. अमळनेर जि. जळगांव) यांचा मुत्यू झाला आहे.
तर जखमींमधील सर्वजण मुडी. ता. अंमळनेर, जि. जळगांव येथील रहिवासी आहेत. प्रमिला गुलाबराव बडगुजर (वय 65), संजय बळीराम भोईर (60) सुशिलाबाई सोनु बडगुजर (67), वत्सलाबाई साहेबराव पाटील (65), सुशिलाबाई बबन नजान (65) विमलबाई भोई (59) प्रतिभा संजय भोई (45) जिजाबाई साहेबराव पाटील (65) संगिता बाबुलाल भोई (56) रत्नाबाई, सुरेखाबाई हिरालाल बडगुजर (53), भागीबाई माधवराव पाटील (52) संगिता मंगिलाल भोई (56) तसेच भोकर, ता?. जि. जळगाव येथील रघुनाथ बळीराम पाटील (70), आणि बाळू भावलाल पाटील (48) यांचा समावेश आहे.
मृत महिलेच्या वारसाला दहा लाख रूपये शासकीय मदत घोषित करण्यात आली आहे. तर जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.








