तिकीट काढण्यावरून वादावादीनंतरचा प्रकार
बेळगाव : सीबीटीहून सुळेभावीला जाणाऱ्या बसमध्ये कंडक्टरला मारहाण करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी बाळेकुंद्री के. एच. ते बाळेकुंद्री खुर्द येथे ही घटना घडली असून मारिहाळ पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. महादेवप्पा मल्लाप्पा हुक्केरी (वय 50) रा. अंजनेयनगर असे जखमी कंडक्टरचे नाव असून त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, मारिहाळचे पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी आदी अधिकाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन या घटनेसंबंधी माहिती घेतली. सुळेभावी बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका तरुणाबरोबर तिकीट काढण्यावरून झालेल्या वादावादीनंतर ही घटना घडली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाण करणाऱ्यांना त्वरित अटक करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी सांगितले.









