तिघांचे अपहरण : पाकिस्तानमध्ये रक्तरंजित खेळ सुरूच
वृत्तसंस्था/इस्लामाबाद
पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतातील मीडिया रिपोर्ट्सनुसार, अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पंजाबमधील पाच जणांना प्रवासी बसमधून खाली ओढून गोळ्या घालून ठार मारले. या हल्ल्यात जखमी झालेल्या आणखी एका प्रवाशाचा नंतर मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 6 इतका झाल्याची माहिती ग्वादरचे उपायुक्त हमुदुर रहमान यांनी दिली. याचदरम्यान इतर तिघांचे अपहरण करण्यात आल्याचे समजते. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही, परंतु जातीय बलोच अतिरेकी गटांनी यापूर्वी पंजाबमधील लोकांवर असे हल्ले केले आहेत.
बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर जिल्ह्यात हा हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. बंदूकधाऱ्यांनी रात्रीच्या वेळी कलमत भागात कराचीला जाणाऱ्या बसमधील पाच प्रवाशांची हत्या केली. एका जखमी प्रवाशाचा नंतर मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या सहा झाली. बंदूकधाऱ्यांनी प्रवाशांची ओळखपत्रे तपासल्यानंतर त्यांची हत्या केली. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध करतानाच संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आणि जबाबदार असलेल्यांवर खटला चालवण्याचे निर्देश दिले.
बलुचिस्तानमध्ये अलिकडच्या काळात बंडखोरांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला 440 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसचे अपहरण करून हल्ला करण्यात आला होता. फुटीरतावादी गट बलोच लिबरेशन आर्मी (बीएलए) च्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. या अपहरणात 18 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 26 ओलिसांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सैन्याने सर्व 33 दहशतवाद्यांना ठार करत 354 ओलिसांची सुटका केली होती.









