तीन महिलांचा मृत्यू दुर्घटनेत 8 जण जखमी
वृत्तसंस्था/ गुंटूर
आंध्रप्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यातील नीरुकोंडा गावानजीक सोमवारी सकाळी एक ऑटो रिक्षा आणि समोरून येणाऱ्या बसची टक्कर झाली आहे. या दुर्घटनेत तीन महिलांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत. नाराकोडुरु-बुदमपाडू मार्गावर रिक्षा अन् बसची टक्कर झाली होती. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिला या शेतात काम करण्यासाठी रिक्षाने जात होत्या. जखमींना नजीकच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. मृत महिला चेब्रोलू तालुक्यातील शुदापल्ली गावात राहणाऱ्या होत्या. सीतारावम्मा, नानचारम्मा आणि अरुणा अशी या महिलांची नावे होती. या दुर्घटनेप्रकरणी गुन्हा नोंद करत पोलिसांनी तपास हाती घेतला आहे.
आंध्रप्रदेशचे परिवहन मंत्री मंडाली रामप्रसाद रेड्डी यांनी या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त पेले आणि जखमींवर गुंटूर रुग्णालयात उत्तम उपचार उपलब्ध करविण्याचा निर्देश अधिकाऱ्यांना दिला. तसेच मृत महिलांच्या परिवारांबद्दल त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत.









