चालकाचे प्रसंगावधान : टिप्परला चुकविण्याच्या नादात बस बाजूच्या गटारीत गेल्याने कलंडली
वार्ताहर /गुंजी
गुंजीनजीक बस अपघात झाला. पण, प्रवासी सुखरुप असल्याची घटना रविवारी दुपारी घडली. सविस्तर वृत्त असे की, गोव्याहून बेळगावकडे जाणारी कर्नाटक परिवहन मंडळाची बस गुंजीनजीक कलमेश्वर मंदिरच्या वळणावर आली असता समोरून दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करून येणाऱ्या टिप्परला चुकविण्याच्या नादात बस बाजूच्या गटारीत गेल्याने कलंडली. केवळ प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून ही बस पलटी होता होता थांबली. त्यामुळे सर्व प्रवासी बचावले. बस गटारीत जाऊन कलंडल्यामुळे बसमधील प्रवाशांना जोराचा धक्का बसला. त्यामुळे प्रवाशांनी आरडाओरड करताच गुंजीतील अनेक नागरिक अपघातस्थळी धावून गेले. प्रवाशांना बसच्या मागील प्रवेशद्वारातून बाहेर पडणे अशक्य असल्याने बस केबिनमधील चालकाचे प्रवेशद्वार आणि त्याच्याविरुद्ध बाजूने असलेल्या खिडकीची काच फोडून बसमधील प्रवाशांना तातडीने बाहेर काढले. यासाठी गुंजीतील नागरिक संदीप नाळकर, चुडाप्पा काळीचे, जोतिबा कुट्रे, सुनील चव्हाण, वैभव गावडे आदींनी प्रयत्न करून मोलाचे सहकार्य केले. अपघाताचे वृत्त खानापूर पोलिसांना समजताच खानापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील एका किरकोळ जखमी प्रवाशाला रुग्णवाहिकेतून इस्पितळात दाखल करण्यात आले. इतर प्रवाशांना रामनगरकडून येणाऱ्या इतर बसमधून खानापूर आगारपर्यंत सोडण्यात आले.
चालकाचे प्रसंगावधान
अपघातास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले की, चालकाने जर प्रसंगावधान राखले नसते तर एका भीषण अपघाताला सामोरे जावे लागले असते. कारण समोरून येणारा टिप्पर हा वळणावर असल्याने अचानकपणे बसच्या समोर ओव्हरटेक करून आला होता. त्यामुळे समोरासमोर अपघात घडला असता. मात्र बस चालकाने नियंत्रण राखून प्रसंगावधानाने बस बाजूला घेतल्याने हा अपघात टळला असल्याचे नागरिकांतून बोलले जात होते. या अपघाताबाबत पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली नसल्याचे समजते.









