सुदैवाने अनर्थ टळला : ओम्नी वाहनातील प्रवासी सुखरूप
खानापूर : खानापूर-जामगाव ही बस मंगळवारी सकाळी जामगावकडे जाताना समोरून खानापूरला येणाऱ्या एका ओम्नी चालकाने बसच्या दिशेने आल्यामुळे बसचालकाने सावधानता बाळगत बस रस्त्याकडेला घेतली. त्यामुळे बस रस्त्याच्या बाजूला गटारीत गेल्याने मोठा अनर्थ टळला. सदर घटना मंगळवारी सकाळी 8.30 च्या सुमारास घडली. बसमध्ये चालक व वाहक दोघेच होते. खानापूर-जामगाव केए 22-एफ 363 ही बस नेहमीप्रमाणे जामगावला सकाळी 8 वाजता निघाली होती. डोंगरगावनजीक असलेल्या भीमगड अभयारण्याच्या फलकानजीक समोरून भरधाव केए 22-एम-8598 ओम्नी आल्याने बसचालकाने सावधानता बाळगत बस रस्त्यावरून खाली घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. याठिकाणी असलेले जामगाव येथील रहिवासी दीपक गवाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने ओम्नी चालकाला बाहेर काढून ओम्नी बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीस मोकळा केला. तरीही ओम्नीचे थोडे नुकसान झाले आहे. बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे ओम्नी वाहनातील प्रवासी सुखरूप बचावले आहेत.









