वृत्तसंस्था/ क्वालालंपूर
मलेशियाच्या पेराकमध्ये मोठी रस्ते दुर्घटना घडली आहे. युनिव्हर्सिटीची बस एका कारला धडकल्याने 15 जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना सोमवारी सकाळी घडली आहे. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे. तर प्रारंभिक तपासानुसार कारसोबत टक्कर झाल्यावर बसचालकाने नियंत्रण गमाविले होते.
पेराक येथील महामार्गावर युनिव्हर्सिटी बसची एका कारसोबत टक्कर झाली. बसमधून विद्यापीठाचे विद्यार्थी प्रवास करत होते. बसचालकाने नियंत्रण गमाविले होते, याचमुळे बसने प्रथम कारला मागून टक्कर मारली आणि मग बस रस्त्यावरून खाली कोसळत उलटल्याची माहिती पेराकचे पोलीस प्रमुख नूर हिसाम नॉर्डिन यांनी दिली आहे.
सुल्तान इदरीस एज्युकेशन युनिव्हर्सिटीचे 15 विद्यार्थी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले आहेत. संबंधित बस तेरेंगानु राज्याच्या जेरटेह येथून पेराकच्या तंजुंग मालिममधील विद्यापीठाच्या मुख्य परिसराच्या दिशेने जात होती. या दुर्घटनेत 13 विद्यार्थ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोन विद्यार्थ्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. दुर्घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. यातील दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.









