20 मीटर खोल नाल्यात कोसळली बस
वृत्तसंस्था/ ग्वाटेमाला सिटी
मध्य अमेरिकेतील ग्वाटेमाला या देशाची राजधानी ग्वाटेमाला सिटीमध्ये एक बस पूलावरून खाली कोसळली आहे. या दुर्घटनेत 55 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रवाशांनी भरलेली ही बस अकासागुस्तलान शहरातून राजधानीच्या दिशेने प्रवास करत होती.
दुर्घटनेपूर्वी अनेक वाहने परस्परांना धडकली होती, यानंतरच बस नाल्यात कोसळल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. दुर्घटनेनंतर बस नाल्यात बुडाल्याने लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. ग्वाटेमालाचे अध्यक्ष बर्नार्डो अरेवालो यांनी देशात 3 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. याचबरोबर लोकांच्या मदतीसाठी सैन्य आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला तैनात केले आहे. प्रारंभिक तपासानुसार संबंधित बस 30 वर्षे जुनी होती, परंतु तिच्या वर्किंग लायसन्सची मुदत संपुष्टात आली नव्हती असे ग्वाटेमालाचे परिवहन मंत्री मिगुएल एंजेल डियाज यांनी सांगितले आहे.
चालकाने बसवरील नियंत्रण गमाविले होते, यानंतर बस अनेक वाहनांना धडक देत रेलिंग तोडून पूलावरून खाली कोसळली होती. दुर्घटनास्थळी बचावकार्याचे काम अद्याप सुरू आहे. दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतला जातत असल्याचे बचावपथकाने सांगितले आहे.









