बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने दुर्घटना
प्रतिनिधी / वास्को
आगशीतील महामार्गावर आंतरराज्य प्रवासी बसला अपघात होण्याची घटना काल गुऊवारी सकाळी घडली. या आलिशान बसमध्ये 18 प्रवासी होते. पैकी 7 जण जखमी झाले. त्यांना गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण गेल्याने ही बस महामार्गावर कलंडली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोवा ते बेंगळूर आणि बेंगळूर गोवा असा नियमित प्रवास करणारी सी बर्ड कंपनीची आंतरराज्य प्रवासी बस असून ती सकाळी बेंगळूरहून गोव्यात दाखल झाली होती. मडगावला काही प्रवासी उतरल्यावर राहिलेल्या 18 प्रवाशांना घेऊन ती पणजीकडे शेवटच्या थांब्यावर जात होती. मात्र, कुठ्ठाळीतील नवीन झुआरी पूल ओलांडल्यानंतर सकाळी साडेसातच्या सुमारास आगशीतील महामार्गावर चालकाचे बसवरील नियंत्रण गेले. त्यामुळे ही बस रस्त्यावरच कलंडली. या अपघातात सात प्रवासी जखमी झाले. इतर सर्व प्रवासी सुखरूप आहेत. 108 ऊग्णवाहिकांमधून जखमींना गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले. आगशी पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केलेला असून चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.









