खरगोनमध्ये जातीय हिंसाचार : 70 हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात
भोपाळ / वृत्तसंस्था
मध्यप्रदेशातील खरगोन येथे रविवारी सायंकाळी श्रीराम नवमीनिमित्त आयोजित शोभायात्रेवर तालाब चौकाजवळ दगडफेक करण्यात आली. यानंतर उसळलेल्या जातीय हिंसाचारात हल्लेखोरांनी 30 हून अधिक दुकाने आणि घरांना आग लावली. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हे प्रकरण थोडे शांत झाले, मात्र मध्यरात्री 12 वाजता पुन्हा हिंसाचार उसळला. या घटनेत 10 पोलीस कर्मचारी आणि 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तसेच पोलीस अधीक्षक सिद्धार्थ चौधरी यांच्या डाव्या पायाला गोळी लागली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सोमवारी जवळपास 70 हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.
रविवारी सायंकाळच्या घटनेनंतर जातीय हिंसाचार भडकल्याने आनंद नगर, संजय नगर, मोतीपुरा येथे घरे जाळण्यात आली. तसेच लुटालूटही करण्यात आली. येथील प्रचंड तणावग्रस्त परिस्थितीमुळे 70 हून अधिक कुटुंबांनी संसार सोडून पळ काढला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेला दुर्दैवी म्हटले आहे. तसेच कोणत्याही दंगलखोराला सोडणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. दंगलखोरांना हुसकावले जात असून हल्लेखोरांकडून सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेचे नुकसान वसूल केले जाणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.









