सर्वपक्षीय नेत्यांकडून फुटीर काँग्रेस आमदारांचा निषेध
प्रतिनिधी /म्हापसा
राज्यातील काँग्रेसच्या आमदारांना फोडण्यासाठी आसामचे मुख्यमंत्री तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव हे कोटय़वधी रुपयांच्या बॅगा घेऊन गेले होते, असा गौप्यस्फोट माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी म्हापसा येथे केला.
पैशांच्या जोरावर भाजपने काँग्रेसचे आमदार चोरले असा आरोप करीत फुटीर आमदारांच्या कृतीचा निषेध करण्यासाठी रविवारी ‘गोवा प्रेमी’ या झेंडय़ाखाली समविचारी पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत म्हापशात दिवाळीच्या आदल्यादिवशी ‘आमदारचोरासुर’ या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन केल्यावर चोडणकर बोलत होते. यावेळी आमदार कार्लुल्स फेरेरा, विजय भिके, विरेंद्र शिरोडकर, जितेश कामत, सुदेश तिवरेकर, सुभाष केरकर, संतोषकुमार सावंत, जवाहर शेटये, नवशाद शेख, फिरोझ खान, प्रणव फडते, रोशन चोडणकर, पंकज नाईक, सुदिन नाईक, प्रिया राठोड, पेडणेकर आदी उपस्थित होते.
गोवा फॉरवर्डचे संतोषकुमार सावंत म्हणाले की, राज्यातील जनतेच्या मनात भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणा विरोधात असंतोष असून तो आजपासून पेटून बाहेर येणार असल्याचे ते म्हणाले.
फुटलेले आमदार लोकांच्या, मतदारसंघाच्या विकासासाठी नाही तर स्वतःचा विकास करु घेण्यासाठी फुटल्याचा आरोप कार्लुस आल्वारिस यांनी केला तर भाजप दुसऱयांना संपवून वर येऊ पाहत असल्याचे सुदेश तिवरेकर म्हणाले.









