साडेचार तोळे सोन्याच्या दागिन्यांसह दोन लाख रोख लंपास
वार्ताहर /नंदगड
बिडी (ता. खानापूर) येथे घराचा समोरील दरवाजा तोडून घरामधील तिजोरीमध्ये ठेवलेले साडेचार तोळ्यांचे सोन्याचे दागिने, दोन लाख रोख रक्कम व अन्य साहित्य चोरांनी लांबविले आहे. त्यामुळे सुमारे 5 लाखाचा फटका संबंधित मालकाला बसला आहे. शेखर गुरुपादपा हलशी रा. बिडी असे मालकाचे नाव आहे. या घटनेची नोंद नंदगड पोलिसात झाली आहे. शेखर यांचे बिडी-सागरे रस्त्याच्या शेजारी घर आहे. शेखर व त्यांची पत्नी रेशन आणण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी 4.30 च्या दरम्यान गावात गेले होते. अवघ्या 35 मिनिटांत ते पुन्हा घरी परतले. त्यानंतर घराच्या समोरील दरवाजाला लावलेला कुलूप तोडून घरात कुणीतरी प्रवेश केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घरात येऊन पाहिल्यानंतर तिजोरीतील 47 ग्रॅम सोन्याचे दागिने व दोन लाख रोख रक्कम लंपास झाल्याचे समजले. शेखर यांची पत्नी नेहमी घरीच राहते. त्यामुळे त्यांनी तिजोरीला कुलूप लावला नव्हता. यामध्ये अडीच तोळ्याचे गंठण, दीड तोळ्याची चेन व अन्य दागिने आहेत. शेखर यांचा मुलगा हुबळी येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. शिक्षणाच्या खर्चासाठी व फी भरण्यासाठी त्यांनी दोन लाख रुपये घरात आणून ठेवले होते. चोरी करून घेऊन जाताना चोरांनी पाठीमागचा दरवाजाही उघडून ठेवला होता. या घटनेची नंदगड पोलिसात रात्री उशिरा नोंद झाली आहे. पोलिसांनी तात्काळ श्वानपथक मागवून चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. श्वान तीन ठिकाणी फिरले. त्यामुळे चोरटे अनेक जण असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत. या चोरीमुळे मात्र बिडी परिसरात घबराट पसरली आहे.









